मुंबई : Bhonga : MNS president Raj Thackeray's ultimatum : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर गृहखातं अॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज ठाकरेंनी भोंग्यांवरुन इशरा दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला पोलीस महासंचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उद्यापासून मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात वाजवण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस अलर्ट झाले आहेत. मुंबई आणि ठाण्यातील प्रमुख मनसे नेत्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. तर काहींना पोलीस ठाण्यात बोलावले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. औरंगाबादमधील सभेतील भाषणात राज ठाकरेंनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवावी, असे आदेश कार्यकर्त्यांना केले आहेत. त्यामुळे अटी शर्थींचं उल्लंघन केल्याचा अहवाल पोलिसांनी तयार केला आहे. 3 पैकी 2 अहवाल सादर झालेत तर 1 अहवाल अजून प्रतीक्षेत आहे. त्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांकडे पाठवला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
पोलिसांच्या सुरक्षा शाखेचा आणि गुप्तवार्ता विभागाचा अहवाल तयार झाला आहे. तर पोलिसांचा कारवाई बाबतच अहवाल मात्र अजून प्रतीक्षेत आहे...सूत्रांच्या माहितीनुसार 16 पैकी 5 अटींचे उल्लंघन झाले आहे. याबाबत अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. आवाजाची मर्यादा ओलांडली असून, दोन धर्मात तेढ निर्माण होईल असेही वक्तव्य केल्याचं अहवालात माहिती असल्याचं सूत्रांनी म्हटले आहे.