कांद्यानंतर आता टॉमेटोचा भाव वधारला, ८० रुपये किलो

कांद्यानंतर आता टॉमॅटोने ग्राहकांना रडवायला सुरूवात केली आहे.

Updated: Oct 9, 2019, 12:35 PM IST
कांद्यानंतर आता टॉमेटोचा भाव वधारला, ८० रुपये किलो title=
संग्रहित छाया

मुंबई : कांद्यानंतर आता टोमॅटोने ग्राहकांना रडवायला सुरूवात केली आहे. बाजारात टोमॅटोने २० ते ३० रूपयांवरून थेट ८० रूपयांवर मजल मारली आहे. कांदे ५० रूपये किलोने विकले जात असतानाच आता टोमॅटोंच्या भावांनीही उचल खाल्ली आहे. टोमॅटो उत्पादन क्षेत्रात अजूनही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे उत्पादन घटल्यामुळे आवक कमालीची कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव शंभरीकडे जात आहे.

परतीच्या पावसाने दिलेल्या फटक्यामुळे कांद्याच्या दरांनी उचल खाल्ली असतानाच टॉमॅटोचाही भाव वधाला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या किरकोळ बाजारात टॉमेटोचे दर किलोमागे ८० रुपयांवर पोहोचल्याचे दिसून येत आहेत. घाऊक बाजारात ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे दर मंगळवारी ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या हवामानाचा फटका टॉमॅटोच्या पिकाला बसल्याने टोमॅटो महाग झाल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. 

वाशीतील घाऊक बाजारातून मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईच्या बाजारपेठेत कृषी मालाची आवक कमी झाली आहे .गेल्या पंधरवडयापासून सातारा, सांगली तसेच पुणे जिल्ह्यातील काही भागांमधून वाशी बाजारात येणाऱ्या टॉमेटोची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे काही दिवस टॉमॅटोसाठी ग्राहकांच्या खिशाला अधिक कात्री लागण्याची शक्यता आहे.