आमदारांनंततर 'मिशन नगरसेवक', शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटानं (Rebel Eknath Shinde) सुरू केलेली धक्कातंत्राची मालिका अजूनही सुरूच आहे. 

Updated: Jul 8, 2022, 09:11 PM IST
आमदारांनंततर 'मिशन नगरसेवक', शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का title=

मुंबई :  शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटानं (Rebel Eknath Shinde) सुरू केलेली धक्कातंत्राची मालिका अजूनही सुरूच आहे. ठाणे आणि नवी मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिल्यानंतर आता कल्याण डोंबिवलीतही शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. (after mla now shiv sena corporator entry in rebel eknath shinde group big blow from uddhav thackeray)
   
ठाणेकर एकनाथ शिदेंनी बंडाचा झेंडा फडकावत मुख्यमंत्रीपदाची बाजी मारली. त्यांची विजयी घोडदौड इथवरच थांबलेली नाही. आता शिंदे गटानं शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच सुरूंग लावलाय. 

कल्याण डोंबिवलीतील 45 माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाचा हात धरलाय. माजी महापौर विनीता राणे यांच्यासह शहरप्रमुख राजेश मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेत आपला पाठिंबा दर्शवला. 

शिवसेनेला कुठे कुठे खिंडार ?

ठाणे महापालिकेतील 67 पैकी 66 माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यानंतर नवी मुंबईतील शिवसेनेच्या 32 माजी नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवलाय. 

तर आता कल्याण डोंबिवलीतील 56 पैकी 45 नगरसेवक शिंदेंच्या गोटात दाखल झालेत. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काळात राज्यातल्या प्रमुख महापालिकांमधील जवळपास 400 नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. 

याचाच अर्थ ठाणे जिल्ह्यात आता शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू झालीय. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंचा प्रचंड दबदबा आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी पक्षसंघटना मजबूत केली. त्यामुळे बंडानंतर शिंदे समर्थक त्यांच्यासोबत येणं स्वाभाविक आहे. 

मात्र आता इतर महापालिकांमध्ये शिंदे गटाला कसा प्रतिसाद मिळतो आणि हे आऊटगोईंग उद्धव ठाकरे कसं रोखणार यावर पुढील राजकीय समीकरणं अवलंबून आहेत.