एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे विरुद्ध 'इंजिन'... गाडी रुळावर येणार?

 एलफिन्स्टन रोड रेल्वे पूल दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी मनसेच्या वतीनं चर्चगेटच्या रेल्वे कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 4, 2017, 08:42 PM IST
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे विरुद्ध 'इंजिन'... गाडी रुळावर येणार?    title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : एलफिन्स्टन रोड रेल्वे पूल दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी मनसेच्या वतीनं चर्चगेटच्या रेल्वे कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या माध्यमातून दुर्घटनेला जबाबदार प्रशासकीय अधिका-यांना मनसे जाब विचारणार आहे. यानिमित्तानं राजकारणात हरवलेला सूर पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंचा पक्ष करतोय.

मनसेच्या गुरूवारच्या मोर्चाची अशी वातावरणनिर्मिती सुरू आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसैनिकांनी कंबर कसली आहे. एल्फिस्टन रोड रेल्वे पुलावर घडलेल्या दुर्घटनेला जबाबदार रेल्वेच्या प्रशासकीय अधिका-यांना जाब विचारण्यासाठी तसंच रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटत नसल्याबद्दल राग व्यक्त करण्यासाठी मुंबईकरांनी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहन पक्षाकडून करण्यात येतं आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं भाजप प्रणित सरकारला लक्ष्य केलं जाणार आहे.

अलीकडच्या काळातलं मनसेचं हे सर्वात मोठं आंदोलन असणाराय. पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरेंनी मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. ऑगस्ट २०१२ मध्ये गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढून, त्यांनी आझाद मैदानात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवला होता. या आंदोलनानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांना पदावरून हटवण्याचा निर्णय आघाडी सरकारला घ्यावा लागला होता. २०१४ मध्ये देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा उदय झाला आणि मनसेचे 'अच्छे दिन' जणू गायबच झाले. २०१४ नंतर मनसेचा सक्रीय राजकारणाचा आणि निवडणुकीतील कामगिरीचा आलेख कमालीचा घसरला आहे. त्यामुळे गुरूवारच्या रेल्वे मोर्चाच्या माध्यमातून रूळावरून घसरलेलं इंजिन पुन्हा रूळावर आणण्याचा मनसेचा प्रयत्न असणार आहे.