आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांना म्हणतात, 'जरा हे पण भोंग्याच्या आवाजात सांगा'

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Updated: Apr 14, 2022, 07:27 PM IST
आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांना म्हणतात, 'जरा हे पण भोंग्याच्या आवाजात सांगा' title=

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपले काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. कारण यापूर्वी राज ठाकरे यांनी घोषणा केली आहे की, अजानच्या आवाजाने अनेकांना त्रास होतो, जोपर्यंत अजान बंद केली जात नाही, तोपर्यंत अजानच्या समोर लाऊडस्पीकरने हनुमान चालिसा वाजवा. ३ तारखेपर्यंत याबाबतीत राज ठाकरे यांनी सरकारला मुदत दिली आहे. ३ तारखेपर्यंत मौलानांची बैठक बोलवा आणि मशीदीवरील अजानचे ते भोंगे खाली उतरवा, नाहीतर हनुमान चालिसा वाजवली जाईल.

आदित्य ठाकरे यांनी मात्र आपले काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसा निर्णयावर धनुष्य रोखून टीकेचा बाण सोडला आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, देशात आणि राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहे, ते देखील त्या भोंग्यावर, भोंग्याच्या आवाजात सांगा.

केंद्र सरकारवर विरोधकांनी महागाई वाढत असल्याची टीका केली आहे, महागाई लपवण्यासाठी जनतेचं लक्ष हटवण्यासाठी भोंग्यासारखे मुद्दे पुढे आणले असल्याचं मत विरोधकांचं आहे.