मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे मुंबईतून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईतील शिवसेना-भाजपच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आदित्य ठाकरे लवकरच आमच्यासोबत विधानसभेत असतील, याचा मला आनंद आहे. एवढेच नव्हे तर ते मुंबईतून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
या पत्रकारपरिषदेला उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. शिवसेनेच्या नेत्यांकडून अनेकदा आदित्य ठाकरे हेच पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी वक्तव्ये करण्यात आली आहेत. याविषयी उद्धव यांना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, हे शिवसैनिकांचे स्वप्न असेल, तर त्यामध्ये काही गैर असल्याचे मला वाटत नाही. सक्रिय राजकारणात आदित्यचे हे पहिले पाऊल आहे. त्यामुळे तुर्तास मुख्यमंत्रीपदापेक्षा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, हीच आदित्यची पहिली इच्छा असावी, असे उद्धव यांनी म्हटले.
तिकीटं कापली नाहीत, जबाबदाऱ्या बदलल्या- फडणवीस
तसेच आकड्यांवर सर्वकाही अवबंलून नसते. मनापासून युती केल्यानंतर चर्चेने प्रश्न बोलून सुटू शकतात. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडतील. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण बदलले आहे. युती होणार की नाही, हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. परंतु, लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण, या चर्चेपेक्षा भावकी टिकली, हे अधिक महत्त्वाचे असल्याचेही उद्धव यांनी सांगितले.