मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मृत्यू नंतरही दिले 11 जणांना जीवनदान

पाच महिन्यांपूर्वीच साकेतचे लग्न झाले होते. पत्नीची साथ अर्धवट सोडून त्याने जगाचा निरोप घेतला आहे. मात्र, त्याने मृत्यूनंतरही 11 जणांना जगण्याची नवी उमेद दिली आहे.

वनिता कांबळे | Updated: May 22, 2023, 10:54 PM IST
मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मृत्यू नंतरही दिले 11 जणांना जीवनदान  title=

Organ Donation : मरावे परी कीर्तिरूपे उरावे! या पंक्ती प्रमाणे खरोखरच घडले आहे. विरार येथे राहणाऱ्या साकेत दंडवते या तरुणाचा वाहन अपघातात मृत्यू झाला. मात्र, त्याने मृत्यू नंतरही 11 जणांना जीवनदान दिले आहे (Organ Donation). साकेत याच्या आई वडिलांनी मुलगा गेल्याचे डोंगराएवढं दु:ख झाले असताना एक मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे तब्बल 11 जणांचा जीव वाचला आहे (Virar News). 

विरार येथे राहणारा 30 वर्षीय साकेत दंडवते या युवकाचा पाच दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र,  या अपघातानंतर त्याचे हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे आदी त्याच्या अवयवांचे दान करण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही त्याने 11 जणांना जगण्याची नवी उमेद दिली आहे.

कसा झाला साकेतचा अपघात?

13 मे रोजी  साकेत हा पुण्यावरून बंगळुरू येथे दुचाकीवरून जात होता. यावेळी महामार्गावर चित्रदुर्ग येथे त्याच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तेथील बसवराज आप्पा मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मेंदूला जबर दुखापत झाल्याने त्याला बंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

साकेतच्या आई वडिलांनी समाजासमोर  नवा आदर्श ठेवला

साकेतचे आई वडिल डॉक्टर आहेत. साकेतच्या मृत्यूनंतर त्याच्या आई वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. साकेतचे वडील विनीत आणि आई सुमेधा दंडवते या डॉक्टर दांपत्याने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. 

पाच महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

साकेत दंडवते याचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. साकेतची पत्नी बेंगळुरू येथे एका आयटी कंपनीत काम करते. साकेत याच्या आई वडिलांनी घेतलेल्या अवयव दानाच्या निर्णयाला साकेत याच्या पत्नीने देखील संमती दिली. अवयवदानानंतर कुटुंबाने शुक्रवारी बेंगळुरूमध्ये साकेतच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

आजोबांनीही केले होते अवयव दान

साकेतचे वडील विनीत हे इंडियन मेडिकल असोसिएशन विरारचे अध्यक्ष आहेत. त्यांची आई डॉ. सुमेधा या नेत्रतज्ज्ञ आहेत. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकजण अवयवदान करत आहे. यापूर्वी साकेतच्या आजोबांनी देखील अवयवदान केले होते. साकेत याने देखील मृत्यूनंतर अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.