मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात दुसऱ्या घोटाळ्याचे पुरावे ईडी कार्यालयात सादर केले. मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची माय कमावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून त्या संदर्भात पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे.
याआधी किरिट सोमय्या यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्यात घोटाळ्या झाल्याचा आरोप करुन त्यासंदर्भातील कागदपत्र ईडीकडे दिली होती. त्यानंतर आज त्यांना आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र सादर केली. या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला आहे. शेल कंपन्यांद्वारे म्हणजे ज्या कंपन्या अनेक वर्षांपूर्वी बंद झाल्या आहेत, त्याच्यात बोगस अकाउंट उघडायचं, त्यात पैसे टाकून कारखान्यात आले. आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडियाला चालवायला दिला होता, इतकंच नाही तर राज्य सरकारकडूनही ब्रिक्स इंडियाला आणखी आर्थिक मदत करण्याचे आदेश देण्यात आले होते, या सगळ्याचा सातबारा ईडीला दिल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स इंडिया ही हसन मुश्रीफ परिवाराची बेनामी कंपनी आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
हसन मुश्रीफ आणि परिवाराने घोटाळ्याचा पैसा या दोन साखर कारखान्यांमध्ये गुंतवले आहेत, त्या संबंधी तपास सुरु आहे, या तपासाला गती मिळावी यासाठी आपण ईडीकडे कागदपत्र जमा केली आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मला गैर कायदेशीर रित्या रोखलं, त्याच्याविरोधात आपण आठवडाभरात तक्रार दाखल करणार असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही पुढच्या आठवड्यात आपण बाहेर काढणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
हे घोटाळेबाज मला अडवण्यासाठी माझावर हल्ले करत आहेत, पण त्यात त्यांचेच पाय खोलवर अडकलेले आहेत. मला कागदपत्र कोणी दिली याचा तपास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा. त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे. मला वेगवेगळी लोक कागदपत्र देतात, ते त्यांनी शोधावं मी सांगणार नाही, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.