उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या किती आमदारांचा गट?

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार फुटणार का ?

Updated: Nov 23, 2019, 09:24 AM IST
उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या किती आमदारांचा गट? title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आज पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पण आता दोघांना ही बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या २२ आमदारांचा पाठिंबा आहे. सोबतच शिवसेनेच्या काही आमदारांचा देखील पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजून याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. ज्यापैकी भाजपकडे १०५, शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं होतं. शिवसेना आमच्या सोबत लढली. पण शिवसेनेने जनतेचा कौल नाकारला. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज होती. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजित पवार यांचे धन्यवाद.'

अजित पवार यांनी म्हटलं की, निवडणुकीच्या निकालानंतर कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्याच सक्षम नव्हता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि इतर समस्य़ांचा सामना करण्यासाठी आम्ही एक स्थिर सरकार देण्यासाठी हा निर्णय घेतला.'