रुग्णांवर उपचार करायला नकार दिला तर परवाना रद्द करणार - आरोग्य राज्यमंत्री

 खासगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास परवाना रद्द होईल.

Updated: Mar 25, 2020, 11:17 PM IST
रुग्णांवर उपचार करायला नकार दिला तर परवाना रद्द करणार - आरोग्य राज्यमंत्री title=

मुंबई : सध्या राज्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. प्रत्येकानेच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. दरम्यान, खासगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे. दरम्यान, खासगी रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्यास शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना संकटाला शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी सामोरी जात आहे. खासगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालये सरकारला मदत करीत आहेत, पण काही डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालये त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. याची गंभीर नोंद घेण्यात आली आहे, असे ते म्हणालेत. याबाबत त्यांनी ऑल इंडिया रेडिओ न्यूजला माहिती दिली आहे.

देशावर आणि राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी आणीबाणीची वेळ आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपल्या परीने सेवा द्यावी, असे आवाहन राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.