मुंडे बहीण-भावाला बीडचा अवघड पेपर! पवारांकडे 2 हुकमी एक्के, मराठा कनेक्शन निर्णायक?

Loksabha Election 2024 Beed Constituency: बीड मतदारसंघामधून भाजपाने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडेंचं समर्थन त्यांना असलं तरी ही निवडणूक त्यांना कठीण जाईल असं चित्र दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 20, 2024, 03:01 PM IST
मुंडे बहीण-भावाला बीडचा अवघड पेपर! पवारांकडे 2 हुकमी एक्के, मराठा कनेक्शन निर्णायक? title=
शरद पवार देणार आव्हान

Loksabha Election 2024 Beed Constituency: बीडमधून भारतीय जनता पार्टीने माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि माजी खासदार पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र पंकजा मुंडेसमोरील आव्हान दिवसोंदिवस अधिक आव्हानात्मक होत असल्याचं चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला या मतदारसंघात अधिक बळ मिळाल्याचं चित्र दिसत आहे. सध्या या मतदारसंघात शरद पवारांकडे एक नाही तर दोन हुकमी एक्के आहेत. 

बडा नेता शरद पवार गटात

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेंची पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवार गट बीडमधील लोकसभा निवडणुकीचं तिकीट देणार असल्याची चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता अजित पवार गटाला मोठा धक्का देत एका बड्या नेत्याने शरद पवार गटामध्ये प्रवेश घेतला आहे. या नेत्यानेच अजित पवार गटातून राजीनामा देत असल्याचं पत्रामधून जाहीर केलं आहे.

अजित पवार आणि धनंजय मुडेंची साथ सोडली

मागील निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडेंविरुद्ध लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या बजरंग सोनावणेंनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करण्याची तयार केली आहे. या माध्यमातून सोनावणेंनी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. बजरंग सोनावणेंनी अगदी अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेत थेट शरद पवार गटात प्रवेश घेण्याची औपचारिकता शिकल्लक आहे. याचसाठी बजरंग सोनावणेंनी अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार गटाला सोड चिठ्ठी दिल्यानंतर 20 मार्च रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बीडमधील अनेक कार्यकर्त्यांसहीत सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. सोनावणे त्यांच्या कार्यकर्त्यांसहीत शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

नक्की वाचा >> वसंत मोरेंचं थेट भाजपाला चॅलेंज! पुणेकरांचा उल्लेख म्हणाले, 'माझ्या उमेदवारीने काय...'

राजीनाम्याचं कारण नाराजी

गेल्या काही दिवसांपासून सोनावणे दशरथ पवार यांच्या संपर्कात होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवारांची भेटही घेतली होती. 2019 मध्ये बजरंग सोनावणेंनी खासदार प्रितम मुंडेंविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यावेळेस धनंजय मुंडेंचा सोनावणेंना पाठिंबा होता. मात्र सध्या महायुतीमधील सर्व चित्र बदललं आहे. आता पंकजा मुंडेंना भारतीय जनता पार्टीने बीडमधून उमेदवारी दिली आहे. पंकजा यांना जिंकून देण्याचं आश्वासन त्यांचे बंधू धनंजय मुंडेंनी दिलं आहे. यामुळेच बजरंग सोनावणे नाराज होते. याच नाराजीमधून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 

मेटे फॅक्टर फार महत्त्वाचा

आता बजरंग सोनावणेमुळे नेमकी कोणाची अडचण होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र बीड मतदारसंघ सहजासहजी सोडायचा नाही असा शरद पवारांचा विचार दिसत आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मराठा चेहरा देऊन पंकजांना मोठं आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. विनायक मेटेंच्या समर्थकांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश करुन ज्योती मेटेंनी निवडणूक लढावी असा ठराव संमत करण्यात आला आहे. विनायक मेटेंना डावललं गेल्याची भावना शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही आहे. विनायक मेटेंचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान राहिलं आहे. 14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षणाच्या बैठकीला जातानाच विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू झालेला. त्यामुळे मराठा समाजाची सहानुभूती त्यांच्या पत्नी ज्योती मेटेंना मिळू शकतो. जरांगेच्या आंदोलनातही बीड धगधगत होतं. 18 लाखांहून अधिक मतदार असलेल्या बीड मतदारसंघात मराठा, ओबीसींमधला वंजारा समाज आणि धनगर समाज निर्णायक भूमिका बजावतो. पवारांनी ज्योती मेटेंचं कार्ड वापरलं तर पंकजा मुंडेंना निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीत किती मतं पडली?

बजरंग सोनावणे शरद पवार गटात जाणे हे पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढवणारं ठरु शकतं. बजरंग बाप्पा तुम्ही निवडणुक लढवा अशी हाक कार्यकर्त्यांनी दिली आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडेंना 6 लाख 78 हजार 175 मतं मिळाली. बजरंग सोनावणेंनी या निवडणुकीमध्ये 5 लाख 9 हजार 807 मतं मिळवलेली. प्रीतम मुंडेंनी 1 लाख 68 हजार 368 मतांनी बजरंग सोनावणेंचा पराभव केला होता.

नक्की वाचा >> 'स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट...'; मोदी-शाहांचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल

आमदारांची ताकद किती?

बीडमध्ये राजकीय परिस्थिती बदलल्याने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं मनोमिलन झालं आहे. मात्र धनंजय मुंडेंचेच खासमखास राहिलेले आणि मराठा नेते असलेले सोनावणे पंकजांच्या अडचणी वाढवू शकतात. बीडमधील परळी, आष्टी, बीड, मालजगाव या 4 मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. केज आणि देवराई या 2 मतदारसंघांमध्येच भाजपाचे आमदार आहेत.