विधान परिषदेच्या विजयाचं श्रेय फडणवीसांचं; राजकीय तज्ज्ञांचं मत! 'या' 2 आघाड्यांवर सरस

Zee 24 Tass Exclusive Maharashtra Legislative Council Election 2024 Rsults: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने अपेक्षेप्रमाणे 9 जागांवर विजय मिळवला असून महाविकास आघाडीचा अतिरिक्त उमेदवार उभा करण्याचा निर्णय अंगलट आल्याचं निकालावरुन स्पष्ट झालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 13, 2024, 01:14 PM IST
विधान परिषदेच्या विजयाचं श्रेय फडणवीसांचं; राजकीय तज्ज्ञांचं मत! 'या' 2 आघाड्यांवर सरस title=
विधान परिषदेच्या निकालानंतर तज्ज्ञांचं मत

Zee 24 Tass Exclusive Maharashtra Legislative Council Election 2024 Rsults: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी अपेक्षेप्रमाणे 9 जागा जिंकत महाविकास आघाडीला धक्का दिला. पुरेशी मतं नसतानाही तिसरी जागा लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या अंगलट आल्याचं चित्र शुक्रवारी लागलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांच्या निकालांमधून स्पष्ट झालं. महायुतीच्या या विजयानंतर महाविकास आघाडीमधील धुसपूस पुन्हा चर्चेत आली असून दुसरीकडे विधानसभेच्या तयारीला लागलेल्या महायुतीमधील पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. असं असतानाच या विजयाचं श्रेय राजकीय विश्लेषकांनी महाराष्ट्रातील भाजपाचे शिर्ष नेतृत्व असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. 

काँग्रेसचा भोंगळ कारभार

विधान परिषदेच्या निकालानंतर 'झी 24 तास'वरील 'विधान परिषदेचा आखाडा' या विशेष चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या राजकीय विश्लेषकांनी निकालावर सविस्तर चर्चा केली. यावेळेस बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी, "महायुतीची कोणतीही मतं फुटली नाहीत. भाजपाची मतं फुटली नाहीत, शिंदेंची मतं फुटली नाहीत किंवा अजित पवारांची मतंही फुटली नाहीत. उलट त्यांना अतिरिक्त मतं मिळाली. काँग्रेसची सात ते आठ मतं फुटली असल्याची शक्यता असं वाटतंय. वडेट्टीवार, नाना पटोले आमचं एकही मत फुटणार नाही, असं सांगत होते. यावरुन काँग्रेसचा भोंगळ कारभार समोर आला आहे," असं निरीक्षण नोंदवलं. 

श्रेय फडणवीसांना द्यावं लागेल

तसेच पुढे बोलताना हेमंत देसाई यांनी, "देवेंद्र फडणवीस यांना याचं श्रेय द्यावं लागेल. त्यांचं प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटर्जी आणि तिन्ही पक्षांमधलं कॉर्डिनेशनसाठी त्यांना मार्क द्यावे लागते. केवळ स्वत:च्या पक्षाचं नाही तर महायुतीमधील तिन्ही पक्षांच कॉर्डिनेशन त्यांनी केलं," असं म्हटलं. हेमंत देसाईंच्या या मताशी 'झी 24 तास'चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी सहमती दर्शवली. "गेल्या वेळेच्या निवडणुकीलाही हेच दिसून आलं. विधान परिषदेच्या चुरशीने लढवल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला टेक्निकली खूप साऊंड असावं लागलं. खूप कमी असे लोक आहेत. या निवडणुकीचे दोन भाग असतात. एक म्हणजे गणित जुळवून आणणे. गणितच जुळवावं लागतं की कोणाला किती प्राधान्य द्यायचं. दुसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची मतं इनटॅक्ट ठेवणं. या दोन्हींमध्ये गेल्या वेळेस फडणवीसांचाच फार मोठा रोल होता," असं कमलेश सुतार म्हणाले. 

नक्की वाचा >> 'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला

हे फडणवीसांचं काम असावं

"यंदाही फडणीसांनी या तिन्ही पक्षांना एकत्रीत बांधण्याचं काम फडणवीसांचं असावं. हे दादांना जमणार नाही. शिंदेंनाही जमणार नाही तर हे फडणवीसांचं काम असावं की सारं जुळवून आणणं, गणित जुळवणं. स्वत:ची मतं इंटॅक्ट ठेऊन वरुन इतर मतं आणायची हे कौशल्य आहे. ही निवडणुकांच्या आधी होणारी निवडणूक आहे हे लक्षात घ्यायला हवं," असंही कमलेश सुतार यांनी या चर्चेदरम्यान म्हटलं.