बारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एन्ट्री निश्चित! अजित पवारांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी

विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार बारामतीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.. त्यामुळे लोकसभेपासून अॅक्टीव मोडवर असलेल्या युगेंद्र पवाराची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय.  

वनिता कांबळे | Updated: Jun 19, 2024, 05:55 PM IST
  बारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एन्ट्री निश्चित! अजित पवारांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी title=

Yugendra Pawar : बारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एन्ट्री निश्चित झाली आहे. अजित पवारांना टक्कर देण्यासाठी शरद पवार नव्या दादाला बारमतीच्या राजकारणात उतरवणार आहेत.  शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या बारामती निवडणुकीतील एन्ट्रीचे संकेत दिलेत. ते बारामतीतील सांगवीमध्ये बोलत होते. नवीन पिढीमार्फत गावात विकास कसा होईल याचा प्रश्न सोडवण्यावर भर देण्याची जबाबदारी आमची असल्याचं पवार म्हणालेत. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवरही टीका केली. 

लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव केल्यानंतर शरद पवारांनी आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. बारामती मतदारसंघात अजित पवार यांना घेरण्याची रणनिती शरद पवारांनी आतापासूनच आखलीय असं दिसतंय. बारामती दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांच्या एन्ट्रीचे संकेत दिले. त्यामुळे बारामतीमध्ये काका अजित पवार विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार असा थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुप्रिया सुळेंना खंबीर साथ देणारे युगेंद्र पवार यांची राज्यभर जोरदार चर्चा झाली.. बारामतीचा दादा बदला, अशी मागणी बारामतीच्या कार्यकर्त्यांकडूनच होऊ लागली आहे. 

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे चिरंजीव आहेत.  शरयू अॅग्रोचे ते सीईओ आहेत.  बारामती विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत.  शांत, संयमी आणि मितभाषी नेतृत्व असे गुण त्यांच्यात आहेत.  राष्ट्रवादीच्या फुटीनंतर  युगेंद्र पवार यांनी आजोबा शरद पवारांना साथ दिली.  लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या बाजूनं बारामतीचं मैदान  युगेंद्र पवार यांनी गाजवलं. 

बारामती म्हणजे शरद पवारांचं होमटाऊन.. दुष्काळी दौ-याच्या निमित्तानं पवारांनी बारामती पिंजून काढायला सुरूवात केलीय.. दरम्यान, त्यांच्या दौ-यामुळं विधानसभेच्या य़शावर काही परिणाम होणार नसल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून केला जातोय.

बारामतीचा दादा बदलण्याचे पवारांनी दिलेले संकेत बरेचशे बोलके आहेत.. शरद पवार  हे राजकारणाच्या आखाड्यातले कसलेले वस्ताद आहेत.. लोकसभेला त्यांनी ते पुन्हा एकदा सिद्ध केलंय. त्यामुळे अजित पवारांसाठी बारामतीचं मैदान मारणं नक्कीच अवघड होऊन बसणार आहे.