Aurangabad Crime : भररस्त्यात भावानेच पुसलं बहिणीचं कुंकू; तिच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत जल्लोष

Aurangabad Crime : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तरुणाच्या मनात होता. याच रागातून तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला संपवलं आहे

Updated: Dec 30, 2022, 11:44 AM IST
Aurangabad Crime : भररस्त्यात भावानेच पुसलं बहिणीचं कुंकू; तिच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत जल्लोष title=

Aurangabad Crime : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट (sairat) चित्रपटाने गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या ऑनर किलिंगला काही वर्षांपूर्वी वाचा फोडलीय. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात (Maharashtra) मात्र आजही असे प्रकार सर्रास पाहायला मिळतायत हे धक्कादायक आहे. संभाजीनगरमध्ये (sambhaji nagar crime) असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकार एकीकडे आंतरजातीय विवाहासाठी (Intercaste marriage) प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे याच लग्नामुळे एका तरुणाचा जीव गेलाय. औरंगाबाद-पुणे महामार्गावर भर दिवसा युवकावर कुऱ्हाडीने वार करून त्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मेहुण्याची हत्या केली आहे.

औरंगाबाद - पुणे महामार्गावर दहेगाव बंगला जवळील इसारवाडी फाटा येथे हा सर्व प्रकार घडला आहे. बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तिच्या भावाच्या मनात होता. याच रागातून त्याने बहिणीच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली. भररस्त्यात हा सर्व प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने कुऱ्हाडीने वार केल्यानंतर रस्त्यावरच जल्लोष करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने सायकलवरुन त्या ठिकाणाहून पळ काढला.

दरम्यान, बापू खिल्लारे असे मृत झालेल्या तीस वर्षीय युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच  वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपीने पळ काढलेल्या दिशेने पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केली होती. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी भेट देत पुढील तपास सुरु केला. प्राथमिक माहितीनुसार आरोपीने बहिणीला पळवून नेल्याचा रागातून आपल्याच भाऊजीची हत्या केल्याचे समोर आले होते.

12 वर्षांनंतर धक्कादायक कृत्य

अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात राहणाऱ्या बापू खिल्लारे या युवकाने 12 वर्षांपूर्वी आरोपीच्या बहिणीसोबत विवाह केला होता. तेव्हापासूनच आरोपीच्या मनात बापू खिल्लारेविरुद्ध राग होता. बापू खिल्लारे याला संपवण्यासाठी आरोपीने तीन दिवस त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी आरोपीने बापू खिल्लारेवर कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली आहे.