श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : थेट बँकेचे फायरवॉल हॅक करून परस्पर बँक खात्यातील रोख उडवणारी टोळी यवतमाळच्या अवधुतवाडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. ठाण्यातील सायबर एक्सपर्ट धिरेंद्रसिंग बिलावल यांनी अगदी दहा दिवसांत हा तपास पूर्ण केला. या टोळीत दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश असून त्यांनी खरेदी केलेला 2 लाख 57 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
यवतमाळ येथील शिक्षक सूर्या अजय शुक्ला यांचे ऍक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून अज्ञात व्यक्तीने परस्परच दोन लाख ५७ हजार ३०६ रुपयांची ऑनलाईन खरेदी केल्याचा प्रकार उघड झाला. फ्लिपकार्ट वरून झालेली ही खरेदी शुक्ला यांनी केलीच नव्हती, मात्र खात्यातून परस्पर पैसे कमी झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. क्रेडिट कार्डाची कुठलीही डिटेल त्यांनी शेअर केली नव्हती. त्यानंतरही या हॅकर्सने थेट बँकेच्या फायरवॉलवरून माहिती गोळा करत परस्पर रक्कम उडविली.
याप्रकरणी सायबर एक्स्पर्ट पोलीस अधिकाऱ्याने शिताफीने तपास सुरु केला. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी मध्यप्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील जहांगिराबाद येथील २१ वर्षीय सागर प्रदीप शेट्टी याच्यासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांनी परस्पर फ्लिपकार्टद्वारे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाईन खरेदी केली. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
बँक खातेधारकांनी आपले क्रेडिट कार्ड वापरताना अतिशय काळजी घ्यावी. पासवर्ड सहज कुणाला कळेल असा ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे.