यवतमाळ: एकतर्फी प्रेम तरुणीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला आहे. या तरुणीवर चाकूने 3 ते 4 वेळा सापासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. एकतर्फी प्रेम जीवघेणं ठरलं आहे.
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मारेगावमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली. जखमी तरुणीला तिच्या काकाने रक्तबंबाळ अवस्थेत खांद्यावरून अर्धा किलोमीटर धावत नेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. चिंतामण पुसनाके असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे.
आरोपीनं तीन ते चार वार तरूणीच्या थेट पोटात केले. तर हल्लेखोरानं चाकूचे तीन ते चार वार केल्यानंतर त्याची मूठ तुटली. त्यामुळे चाकूचा धारदार भाग तरुणीच्या पोटातच राहिल्यानं ती क्षणातच रक्तबंबाळ झाली. चाकू तरुणीच्या पोटात अडकल्यानं सध्या या तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.
पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी तिला यवतमाळमधल्या वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं आरोपी चिंतामण पुसनाके याला अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.