यवतमाळ : दिलासादायक बातमी आहे, यवतमाळमध्ये विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने आता निगेटिव्ह आले आहेत. यवतमाळ मध्ये सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. पॉझिटिव्ह आलेल्या तिन्ही रुग्णांचे १४ दिवसानंतर पुन्हा दोन नमुने प्रयोगशाळेत पाठविले असता त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहे.
या तिघांनाही आता विलगीकरण कक्षातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सुट्टी देण्यात आलेल्या तिघांनाही पुढील 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.
दुबईवरून जिल्ह्यात आलेल्या नऊ जणांना लक्षणे असल्यामुळे १२ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या सर्वांचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथे पाठविण्यात आले. यापैकी तीन जणांचे नमुने पॉझीटिव्ह तर उर्वरीत सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले होते. पॉझीटिव्ह नमुने असलेले तीन जण तेव्हापासूनच विलगीकरण कक्षात दाखल होते. या तिघांचे दोन नमुने 14 दिवसानंतर तपासणीसाठी पुन्हा पाठविण्यात आले.
अथक उपचारानंतर पाठविण्यात आलेले उर्वरीत दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे या तिनही नागरिकांना विलगीकरण कक्षातून सुट्टी देण्यात आली आहे. तर शुक्रवारी रात्री एका नागरिकाला विलगीकरण कक्षात दाखल केल्यामुळे सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात केवळ एक नागरिक आहे. तर जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या ८९ झाली आहे.