Sadanand More on Gautami Patil: ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे (Sadanand More) यांनी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि ज्येष्ठ कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावर टीका केली आहे. गौतमी पाटीलने लावणीची संस्कृती बिघडवली असं सदानंद मोरे म्हणाले आहेत. तसंच इंदुरीकर महाराज यांना वारकरी संप्रदायातील लोक नावं ठेवतात असंही त्यांनी म्हटलं. गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे.
संतसाहित्य आणि लोककलांचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या जन्मदिनानिमित्त संत विचार प्रबोधिनीतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘ड वारकरी कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांना ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार पुरस्कार ’ आणि प्रसिद्ध लोककलावंत रघुवीर खेडकर यांना ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती लोककला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना सदानंद मोरे यांनी गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती.
"डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या स्मृतीचा पुरस्कार कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप आणि तमाशा क्षेत्रातील रघुवीर खेडकर यांना देण्यात आला. त्यामुळे या दोन्ही क्षेत्राबद्दल मी बोललो. गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज यांच्यावर त्यांच्याच क्षेत्रातील लोक टीका करतात हे त्यांच्यातील साम्य आहे. हे आमच्यात बसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे का होतं याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे," असं सदानंद मोरे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की "प्रत्येक क्षेत्राची एक सांस्कृतिक चौकट असते. वर्षानुवर्षं त्याची उत्क्रांती होत असते. तिच्यापेक्षा एकदम बाहेर जाऊन कोणीतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर साहजिक लोकांच्या भुवया उंचावतात. हे स्वाभाविक आहे".
"महाराज खूप सामाजिक प्रश्न मांडतात, त्यावर माझा काही आक्षेप नाही. पण ते ज्या पद्धतीने ते मांडतात ती कीर्तनाच्या चौकटीत बसत नाही. याचा परिणाम असा झाला की, सामाजिक आकलन कमी असणारेही महाराजांची नक्कल करायची म्हणून कशाही पद्धतीने ती करु लागली. विनोदाचार्य अशी नावं येऊ लागली. विनोद हा किर्तनाचा मुख्य रस नाही," असंही सदानंद मोरे यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यात मानधनावरुन वाद निर्माण झाला होता. गौतमी पाटील 3 गाण्यासाठी 3 लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते. यावर गौतमी पाटीलनेही त्यांना उत्तर दिलं होतं.
"महाराजांचा गैरसमज झाला असावा. ते सांगत आहेत तेवढं आमचं मानधन नाही. मी 3 गाण्यांसाठी 3 लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजन का केलं असतं? आमच्या टीममध्ये 11 मुली आहेत. एकूण 20 जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाली होती.