नांदेड : शहरात भरवस्तीतल्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेला बियरबारवर महिलांनी हल्लाबोल केला. तीन दिवसांपूर्वीच हा बियरबारच शहरातल्या कौठा रस्त्यावर सुरू करण्यात आला. मात्र लोकवस्तीत सुरू असलेल्या या बियरबारच्या जवळच शाळा आणि मंदिरही आहे. त्यामुळे या बियरबारला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध होता. मात्र जनतेचा विरोध डावलून या बियरबारला परवानगी मिळाली. त्यामुळे संतप्त महिलांनी या बियरबारची तोडफोड केली.
कौठा रोड भागात आधीच गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. त्यात शाळा आणि भरवस्तीत हा बिय़र बार सुरू केल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे महिलांनी ठिय्या आंदोलन करत या बियरबारची तोडफोड केली. विशेष म्हणजे दोन स्थानिक नगरसेवकांनीही या बियरबारला विरोध केला होता. मात्र त्यांच्या विरोधालाही न जुमानता पोलिसांनी या बियरबारला परवानगी दिलीच कशी, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय. कोणत्याही परिस्थितीत हा बियरबार चालू देणार नसल्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय. तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे हा बियर बार बंद करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलंय.