पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडनजिक म्हाळुंगे गावात मांजर घरात शिरल्याच्या कारणावरून एका महिलेची हत्या झालीये. गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत क्षुल्लक कारणावरून थेट हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.
जेवताना लिंबू दिले नाही म्हणून वेटरची हत्या..!, भुर्जी दिली नाही म्हणून पत्नीची हत्या...!, बोलत नाही म्हणून मुलीवर एका मुलाचे ब्लेडनं वार..!, मैत्री करत नाही म्हणून आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला..!, चिकनच्या वजनावरून झालेल्या वादातून दुकानदाराचा गिऱ्हाईकवर हल्ला...!
गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या या घटना... आता यामध्ये भर पडलीये ती शेजाऱ्याची मांजर घरात आली म्हणून केलेल्या हत्येची...
म्हाळुंगे इथं प्रभा रणपिसे या महिलेचं मांजर शेजारच्या घरात गेलं. शेजाऱ्यांनी या मांजराला बाहेर फेकलं. रणपिसे त्याचा जाब विचारण्यासठी शेजारी गेल्या असताना त्यांच्या डोक्यात बांबूनं मारहाण करण्यात आली. यातच रणपिसे यांचा मृत्यू झाला...
या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अमोल बालगुडे, गणेश पाटील, आकाश मोंढे आणि राजू साळवे या आरोपींना अटक केलीये. क्षुल्लक कारणावरून अशा हिंसक घटना होणं हे चांगल्या समाजाचं लक्षण निश्चितच नाही. ही विकृती मानसिक आजाराचा भाग असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.. तुटत चाललेला संवाद, वाढता एकटेपणा आणि प्रत्येक बाबतीत स्वतःचा मोठेपण दाखवण्याची सवय यामुळे असा भावनांचा उद्रेक होतो.
हा मानसिक आजार असल्याचं बरेच जण मान्यच करत नाहीत... हे एकदा मान्य केलं तर त्यावर उपचार करून अशा घटनांवर आळा घालता येऊ शकेल... मात्र कुटुंबातच संवादाचा आभाव असल्याचा हा परिणाम असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे.
समाजामध्ये वाढत चाललेली ही विकृती वेळीच आटोक्यात आणणं आवश्यक आहे. बळी तो कान पिळी, हे मराठीच्या पुस्तकात ठीक आहे. पण त्याचा प्रत्यक्ष अवलंब सुरू झाला, तर मात्र शहर आणि जंगल यातला फरकच संपेल...