लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : बिबट्याने (Leopard) जबड्यात पतीचं डोकं घट्ट पकडलं असतानाही पत्नीने हार न मानता बिबट्याशी झुंज दिली आणि पतीचे प्राण वाचवले. पारनेर (Parner) तालुक्यातल्या दरोडी चापळदरा इथं घडलेल्या या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत असून त्या महिलेच्या धाडसाचं कौतुक होत आहे.
संजना पावडे असं या धाडसी पत्नीचे नाव आहे तर गोरख पावडे असं बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
शुक्रवारी 25 तारखेच्या रात्री जनावरांच्या गोठ्यातून आवाज येत असल्याने गोरख पावडे गोठ्यात पाहिला गेले. गोठ्यात बिबट्या शिरल्याने जनावरं बिथरली होती. गोरख तिकडे जाताच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचं डोकं जबड्यात पकडलं, यावेळी गोरख यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरु केला.
पतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच पत्नी संजनाने गोठ्याकडे धाव घेतली. समोरचं दृष्य बघताच ती हादरली पण घाबरली नाही. जीवाची पर्वा न करता तीने बिबट्याशी झुंज दिली. संजनाने बिबट्याचे पाय आणि शेपटी ओढत त्याला मागे खेचलं, त्याचवेळी तीने बिबट्याच्या पोटात बुक्क्यांचा मारा केला.
दुसरीकडे पावडे यांचा पाळीव कुत्राही मालकाच्या मदतीला धावून आला. मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने बिबट्याच्या गळ्याचा चावा घेतला. तर गोरख यांचे वडिल दशरथ यांनी बिबट्यावर दगडांचा मारा केला. सर्व बाजूने हल्ला झाल्याने बिबट्याने जबड्यातून गोरख यांना सोडत धूम ठोकली.
पावडे कुटुंबियांनी दाखवलेल्या एक जुटीने गोरख यांचे प्राण वाचले. संजना पावडे यांनी दाखवलेल्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे