महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलं भाकीत

चंद्रकांत पाटील यांनी साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

Updated: Dec 20, 2021, 08:07 PM IST
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलं भाकीत title=

कोल्हापूर : राज्यात राष्टपती राजवट लागू करण्यासाठी जी कारणे लागतात ती सर्व कारणे महाविकास आघाडी सरकारनं पूर्ण केली आहेत असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत.

राज्यातील सरकारी नोकर भरतीच्या पेपरफुटीची आणि परीक्षांमधील घोटाळ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्या मागणीचे समर्थनही चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 

कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आरोग्य विभाग, म्हाडा आणि आता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळे यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत पाहोचत आहेत. त्याची चौकशी करण्यास त्याच्यावर असलेली संस्था पाहिजे. जे आरोपी तेच न्यायाधीश असे होऊ शकत नाही. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी योग्य आहे.

राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यायची असते. पण, सरकारने तीन वेळा निवडणूक टाळली. राज्यपालांचे कुलगुरू नियुक्तीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला. 

ज्या कारणांसाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्यापैकी आता कोणतेही कारण बाकी नाही. इंदिरा गांधी यांनी किंवा काँग्रेसने ज्या प्रकारे अनेकदा विविध राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली त्या पद्धतीने भाजपाचे नेतृत्व निर्णय घेत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.