Sharad Mohol Murder : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. त्यानंतर संपूर्ण पुण्यात (Pune Crime News) याचीच चर्चा होताना दिसत आहे. शरद मोहोळ याच्या हत्येनंतर पुण्यात गँगवॉर सुरू होणार की काय? अशी भीती व्यक्त केली जातीये. शरद मोहोळ याच्या टोळीतल्या माणसानेच, मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (Munna Polekar) याने शरद मोहोळ याचा गेम वाजवला. 20 वर्षाचा तरुण प्रमुख मारेकरी याच्यासह आत्तापर्यंत 8 आरोपींना पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अशातच आता शरद मोहोळच्या हत्याचं कारण समोर आलं आहे.
शरद मोहोळच्या हत्येचं कारण काय?
दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपीचं भांडण झालं होतं. त्यावेळी आरोपीला शरद मोहोळने मारहाण केली होती. त्याचबरोबर शिवीगाळ करणं, मारहाण करणं, चारचौघात अपमान करणं असं कृत्य शरद मोहोळने केल्यामुळे आरोपीच्या मनात शरद मोहोळविषयी राग होता. आरोपी आणि मोहोळ एकाच परिसरात राहत असल्याने सततचा वाद होत असायचा, त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने 10 वर्षानंतर प्लॅन रचला.
आरोपींनी तीन पिस्टल खरेदी केल्या. शरद मोहोळच्या संपूर्ण दिनक्रमाची आरोपींनी रेकी केली. शरद मोहोळ कुठं जातोय? दिवसभर काय काय करतो? कुणाला भेटतो? कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी असतो? याची खडानखडा माहिती आरोपींनी मिळवली अन् योग्य वेळी गेम वाजवला. आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळच्या टोळीत घुसवलं होतं. त्यामुळे मुन्ना पोळेकर सतत शरद मोहोळ सोबत असायचा. त्यानेच संपूर्ण रेकी केली अन् आरोपींना माहिती पुरवली अन् योग्य वेळेची वाट पाहिली.
शुक्रवारी दुपारी एक वाजून वीस मिनिटाच्या सुमारास शरद मोहोळ सुतारदरा येथील घरातून बाहेर पडला. लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होता. त्यावेळी मुन्ना पोळेकर देखील त्याच्यासोबत होता. सगळा प्लॅन रचला गेला. शरद मोहोळला मारण्यासाठी ठिकाण देखील ठरवण्यात आलं. घरातून बाहेर पडताच मुन्ना पोळेकरने शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्यानंतर शरद मोहोळ तिथंच खाली कोसळला आणि आरोपींनी चार चाकी गाडीतून पळ काढला. मात्र, पुणे पोलिसांनी प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पुण्याला पुन्हा गँगवॉरचं ग्रहण?
दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणात एका वकिलाचाही सहभाग असल्याचे आता समोर आले आहे. हा वकीलच आरोपींना मार्गदर्शन करत होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी चतुराईने काम करत आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई केली जात आहे. मात्र, दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे आता पुणे सुरक्षित आहे का? पुण्याला पुन्हा गँगवॉरचं ग्रहण लागणार का? असा सवाल विचारला जात आहे.