पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पिंपरीतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनला (Phugewadi Metro Station) भेट दिली आहे. यावेळी पवार यांनी फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Phugewadi To PCMC Metro Station) असा मेट्रोने प्रवास केला.
शरद पवार (Sharad Pawar) यांचा मेट्रो कामाच्या पाहणी करण्याचा नियोजित दौरा नव्हता. त्यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. मेट्रो कामासंदर्भात विविध गोष्टी पवारांनी जाणून घेतल्या.
'आयत्या पिठावर रेघोट्या'
दरम्यान, शरद पवार यांच्या मेट्रो भेटीवर भाजपाने टीका केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचं प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पंधरा वर्षे आणि देशात दहा वर्षे सरकार असताना हा प्रकल्प रखडला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाच्या सर्व परवानग्या मिळवून काम सुरू करण्यात आलं. पुणे मेट्रो हा अकरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे व त्यामध्ये थेट सहभाग आणि कर्जाला हमी असा केंद्र सरकारचा आठ हजार कोटी रुपयांचा वाटा आहे. राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेचा मिळून तीन हजार कोटींचा हिस्सा आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली
पुणे मेट्रोच्या एका टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे ठरलं होतं पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अशा स्थितीत शरद पवारांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी करणे आणि त्यांच्यामुळे प्रकल्प झाल्याचे भासविणे हा आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार आहे.
मेट्रोची चाचणी करायची होती तर त्यासाठी केवळ शरद पवार यांना का निमंत्रित केले असा आपला मेट्रो प्रशासनाला सवाल आहे. पुण्यात आठ विधानसभा सदस्य आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये तीन विधानसभा सदस्य आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट आहेत. माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर हे पुण्याचे निवासी आहेत. मेट्रो प्रशासनाला उद्घाटनपर धाव घ्यायची होती तर त्यांनी या सर्व लोकप्रतिनिधींना तसेच पुण्याच्या महापौरांना सन्मानाने सहभागी करायला होते. त्यांनी केवळ एका नेत्याला श्रेय देण्याचा का प्रयत्न केला, असा आपला सवाल आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.