अजित पवार 2004 ला मुख्यमंत्री का झाले नाहीत? 'लायक' उमेदवार सांगत आव्हाडांनी काढला पाणउतारा, म्हणाले...

Maharastra Politics : माझ्या नशिबी मुख्यमंत्रीपद असतं असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) गेल्या 20 वर्षांपासून मनात असलेली खदखद बोलून दाखवली. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendtra Awhad) उत्तर दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: Apr 29, 2024, 04:22 PM IST
अजित पवार 2004 ला मुख्यमंत्री का झाले नाहीत? 'लायक' उमेदवार सांगत आव्हाडांनी काढला पाणउतारा, म्हणाले... title=
Jitendtra Awhad On Ajit Pawar Maharastra Politics

Jitendtra Awhad On Ajit Pawar : 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) मुख्यमंत्रीपदाची संधी होती. छगन भुजबळ, आबा पाटील किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, असं वक्तव्य बारामतीतील प्रचारसभेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) चर्चेला उधाण आलं आहे. जर माझ्या नशिबात असतं तर मीही मुख्यमंत्री झालो असतो, असं म्हणत अजित पवार यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून मनात असलेली खदखद बोलून दाखवली. अशातच आता अजित पवार यांच्या वक्तव्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendtra Awhad) उत्तर दिलंय.  

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

सन 2004 मध्ये मला साहेबांनी मुख्यमंत्री केले नाही, असं अजित पवार खासगीमध्ये बोलत आहेत. सन 2004 मध्ये नक्कीच राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या. पण, त्या जास्तीच्या जागा तुमच्यामुळे नाही तर आर. आर. पाटील  यांच्यामुळे आल्या होत्या. आर.आर. पाटील यांनीच जेम्स लेन प्रकरणात कारवाई केली होती. समाज पेटून उठलेला असतानाही आम्ही जेव्हा जेम्स लेन आणि पुरंदरे यांच्यावर बोलत होतो. तेव्हा, तुम्ही बोलू नका, असे सांगत होतात, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना टोला लगावला.

2004 मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी पद्मसिंह पाटील,  विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील, जयंत पाटील, मधुकरराव पिचड हेच लायक उमेदवार होते. पण या सर्व ज्येष्ठ नेत्यांना सोडून अजित पवार यांना मुख्यमंत्री केले असते तर जनमाणसात वाईट संदेश गेला असता म्हणून शरद पवारांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवून 5 अतिरिक्त महत्वाची मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळवून घेतली, असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी दिलं आहे.  

दरम्यान, अजित पवार, तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिलं. आता तुमच्या या खासगीतील चर्चेमुळे तुमचे स्वार्थाचे गणित उघड झालंय. साहेबांनी आपणाला मुख्यमंत्री केले नाही, हे सांगून अजित पवार हेच आता अप्रत्यक्ष सांगत आहेत की.. मी स्वार्थी नंबर 1 आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.