विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : ताजमहालाची हुबेहुब प्रतिकृती म्हणजे औरंगाबादचा 'बिबी का मकबरा'... औरंगजेबाचा मुलगा आझमशहा यानं हा मकबरा बांधला, अशी इतिहासात नोंद आहे. मात्र हा इतिहासच खोटा असल्याची बाब आता पुढं आलीय. मग बिबी का मकबरा नक्की बांधला तरी कुणी?
औरंगाबादचा बिबी का मकबरा म्हणजे वास्तूशिल्पकलेचं बेजोड उदाहारण... ताजमहालाइतकीच सुंदर प्रतिकृती... १६५७ मध्ये पाचव्या मुलाला जन्म देताना औरंगजेबाची बेगम दिलरस बानू हिचा मृत्यू झाला.. तिला जिथं दफन केलं, तोच हा बिबी का मकबरा... औरंगजेबाचा मुलगा आझमशाह यानं मकबरा बांधल्याचं सांगितलं जातं. औरंगाबाद गॅजेटिअरमध्ये तशी नोंद आहे. मात्र, हा इतिहास खोटा असल्याचा दावा औरंगाबादचे इतिहास तज्ज्ञ दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी केलाय..
'बिबी का मकबरा' १६५३ साली साली बांधण्यास सुरुवात झाली आणि १६६० मध्ये तो बांधून पूर्ण झाला. मग १६५३ मध्ये जन्मलेला औरंगजेबाचा मुलगा आझमशाह मकबरा कसा बांधू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
हा मकबरा औरंगजेबानंच बांधल्याचे आणखीही काही पुरावे आहेत. ताजमहालाचे वास्तूविशारद अब्दुल हमीद लाहोरी यांच्या पुस्तकात औरंगजेबानं 'बिबी का मकबरा' बांधण्यासाठी परवानगी मागितल्याची आणि बांधल्याची नोंद आहे... तर १६५३ च्या सुमारास औरंगाबादकडं आग्रा आणि राजस्थानहून मोठे दगड आणल्याची माहिती फ्रेंच ट्रॅव्हलर ट्रॅव्हरनिअर याच्या पुस्तकात आहे. तर १६८० मध्ये औरंगजेबाच्या आदेशानं आझमशाह यानं मकबऱ्याची डागडुजी केल्याची नोंद ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ जादूनाथ सरकार यांच्या 'हिस्टरी ऑफ औरंगजेब' पुस्तकात आहे. त्यामुळं हा मकबरा औरंगजेबानंच बांधल्याचं स्पष्ट होत असल्याचं इतिहास तज्ज्ञ सांगतात.
'बिबी का मकबरा' कुणी बांधला, याबाबत इतिहास तज्ज्ञांनी पुरात्तव विभागाला वेळोवेळी माहिती दिलीय. केंद्र सरकारशी पत्रव्यवहारही केलाय. आता ही चूक कधी सुधारणार, याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय.