Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेचे कोणते आमदार अपात्र ठरणार? याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हाती असणार आहे. सुप्रीम कोर्टानं याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानुसार राहुल नार्वेकरांनी शिवसेना शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्यात. गुरुवारी दुपारी 12 वाजता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात याबाबतची सुनावणी सुरू होणाराय. त्याआधी अंतिम रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे 500 पानी लेखी म्हणणं मांडलंय. तर प्रत्यक्ष सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि अॅड. असीम सरोदे हे ठाकरे गटाकडून युक्तिवाद करतील, विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्यास वैयक्तिक म्हणणं मांडण्याची तयारीही ठाकरे गटाच्या आमदारांनी केल्याचं समजतंय. तर, दुसरीकडं शिवसेना शिंदे गटानंही कायदेशीर लढाईसाठी जय्यत तयारी केलीय.
शिवसेना शिंदे गटानं तब्बल 6 हजार पानाच लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांना पाठवलंय. लेखी उत्तरासोबत काही पुरावेही सादर करण्यात आल्याचं समजतंय
उर्वरित पुरावे प्रत्यक्ष सुनावणीवेळी सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमचाच पक्ष अधिकृत शिवसेना पक्ष असून, प्रत्यक्ष सुनावणीत युक्तिवाद करण्याची भूमिका शिंदे गटानं घेतल्याचं समजतंय.
एवढंच नव्हे तर सध्या शिंदे गटासोबत असलेले बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर आणि नरेंद्र बोंडेकर या अपक्ष आमदारांनाही शिवसेना ठाकरे गटाकडून नोटीस बजावण्यात आलीय. या आमदारांचा पूर्वी शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा होता. मात्र सत्तांतरानंतर ते शिंदे गटासोबत गेल्यानं त्यांना नोटीस बजावण्यात आलीय.. त्यामुळं या अपक्ष आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार लटकतेय.
आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचं सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात ढवळाढवळ करणं सुप्रीम कोर्टानं कटाक्षानं टाळलं. आता राहुल नार्वेकर यासंदर्भात काय निकाल देतात, याकडं राजकीय तसंच कायदेतज्ज्ञांचं देखील लक्ष लागलंय. या निकालाचे दूरगामी राजकीय परिणाम होणार असल्यानं नार्वेकरांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीपूर्वी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पंढरपुरात विठोबाचं दर्शन घेतलं. सुप्रीम कोर्टाने लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा अशी मागणी आमदार परब यांनी केलीय. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हे सरकार जातं की राहतं हे पाहावं लागेल असा टोलाही त्यांनी लगावला.