Praful Patel Interview: अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटले आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय. अशातच आता अजित पवार यांच्या बाजूने उभे राहिलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी झी 24 तासला दिलेल्या ब्लॉक अँड व्हाईटमध्ये मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? असा सवाल प्रफुल्ल पटेल यांना विचारला गेला. त्यावर, गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये चर्चा होत होती. अनेकांची इच्छा होती की भाजपसोबत जावं. आम्ही वेगळी काही भूमिका घेतली नाही. रातोरात हा निर्णय झाला नाही. सर्वांनी पक्ष म्हणून ठरवलं, आमदार आणि पदाधिकारी सर्वजण होते. भाजपमध्ये जाण्याची वर्षभरापासून चर्चा होती. पवार मात्र या प्रक्रियेत नव्हते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
शरद पवार माझे गुरू आहेत. मला शरद पवारांवर भाष्य करायचं नाही. शरद पवार आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. शरद पवार हे माझ्यावर नाराज होणार नाहीत, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. जयंत पाटील यांना अजिबात अधिकार नाहीत. निवडणूक प्रक्रियेतून त्यांची निवड झालेली नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.
तुम्हाला केंद्रात मंत्रीपद मिळतंय का? असा सवाल प्रफुल्ल पटेल यांना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी हा निर्णय महाराष्ट्रापूरता घेण्यात आला आहे. त्यामुळे माझ्या मंत्रिपदाची चर्चा नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.
दरम्यान, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करुन त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. या कारवाईनंतर थोड्याच वेळात अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांना आम्हाला पक्षातून बडतर्फ करण्याचा अधिकार नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. अजित पवार यांच्या बंडामागे प्रफुल्ल पटेल असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहेत. त्यामुळे आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.