'ज्या राज्यात राहता, किमान तिथलं... ', जेव्हा आर आर पाटलांनी अमिताभ बच्चन यांना झापलं अन् ते फक्त सॉरी बोलत राहिले

R R Patil Angry : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आर आर पाटील यांना महाराष्ट्राबाबत किती आत्मियता होती, हे कळून येतं. ज्यासाठी त्यांनी बॉलिवूडचा शहनशाहला देखील खडेबोल सुनावले आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 18, 2024, 09:33 PM IST
'ज्या राज्यात राहता, किमान तिथलं... ', जेव्हा आर आर पाटलांनी अमिताभ बच्चन यांना झापलं अन् ते फक्त सॉरी बोलत राहिले title=

महाराष्ट्राचे लोकप्रिय नेता आणि माजी गृहमंत्री रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील आजही आपल्या चांगुलपणामुळे ओळखले जातात. महाराष्ट्राचा लोकप्रिय नेता असलेले आर आर पाटील हे तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. आर आर पाटील यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद सांभाळले आहे. आर आर पाटील यांचे 16 फेब्रुवारी 2015 रोजी कर्करोगाने निधन झाले. पण आता सोशल मीडियावर आर आर पाटील यांचा एक किस्सा व्हायरल होत आहे. 

हा किस्सा आर आर पाटील यांच्यासोबत काम करणारे गणेश जगताप यांनी सांगितला आहे. हा किस्सा एनसीपीएच्या नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सध्ये एका कार्यक्रमात घडलेला आहे. गणेश जगताप यांनी 'बोल भिडू' ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. 

काय आहे हा किस्सा 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bol Bhidu (@bolbhidu)

एनसीपीएला सर्व राज्याच्या पर्यटन विभागाचा मेळावा भरलेला होता. ज्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स होते. एका संध्याकाळी आर आर पाटील स्टॉल्सला भेट देण्यासाठी आले. तेव्हा युपीच्या स्टॉलला प्रचंड गर्दी होती. बाकीच्या कुठल्या स्टॉलवर फारशी गर्दी नव्हती. महाराष्ट्राच्याही स्टॉलवर गर्दी नव्हती. 

गणेश यांनी पुढे सांगितले की, त्यावर आबांनी विचारलं, तिकडे एवढी गर्दी का आहे? तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांचे ब्रँड ऍम्बॅसिडर अमिताभ बच्चन आहेत आणि ते त्या ठिकाणी आल्यामुळे गर्दी आहे. त्यावर आर आर पाटील यांनी एकच प्रश्न विचारला की, महाराष्ट्राच्या स्टॉलवर आले होते का? त्यावर अधिकाऱ्यांनी नाही म्हटले. युपीचे ब्रँड ऍम्बॅसिडर आहेत म्हणून तिकडेच गेले. 

पुढे आर आर पाटील निघून गेले. गाडीत बसल्यावर ते मला म्हणाले की, अमिताभला फोन लाव. मी म्हणालो की, ते अजून तिथेच असतील. तर आर आर पाटील म्हणाले की, लाव तर खरं. त्यांच्या ऑफिसला फोन लावला आणि निरोप दिला, असं गणेश जगताप म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, त्यानंतर अमिताभ यांचा फोन आला. आणि तीन ते चार मिनिटं आर आर पाटील अमिताभ यांना झापत होते. आर आर पाटील म्हणाले की, या राज्याने एवढं सगळं दिलं, लोकप्रियता दिली, पैसे दिले, काम दिलं, एवढा मानसन्मान दिला. इथं राहून तू मोठा झालास आणि तुला एकदाही असं वाटलं नाही की, आमच्या स्टॉलवर यावं, एवढी तुझी नैतिकता घसरली... अशा शब्दात आर आर पाटील यांनी खडेबोल सुनावले. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी वारंवार माफी मागितली.