NCP Working Presidents : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांनी ही मोठी घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. मात्र त्यावेळी काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारीचं वाटप करणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारणीतील नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मात्र यामध्ये अजित पवार यांच्या नावाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मात्र राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार यांचाही या निर्णयाला पाठिंबा असल्याचे म्हटलं आहे. मात्र या भाषणावेळी अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये घोषणेवेळी अजित पवार मान खाली घालून रिकाम्या पाण्याची बाटलीसोबत खेळत असल्याचे दिसून आले आहे.
शरद पवार सुप्रिया सुळेंवर जबाबदारी सोपवताना अजित पवार काय करत होते?#SharadPawar #Ajitpawar #Supriyasule pic.twitter.com/OExEogvObR
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 10, 2023
अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळेंवर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली नाही. या घोषणेनंतर अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते. मात्र अजित पवार कार्यक्रम स्थळावरून काहीही न बोलताच निघून गेले. त्यानंतर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकही पार पडली. पण, अजित पवार मात्र या बैठकीला हजर नव्हते. मात्र काही वेळाने अजित पवार यांनी ट्वीट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!," असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.