AWS system for safety of mumbai local : राजस्थानमध्ये सोमवारी (18 मार्च) अजमेरमधीस मदार रेल्वे स्थानकाजवळ साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये जोरदार टक्कर झाली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये एक्स्प्रेसच्या इंजिनसह 4 डबे रुळावरुन घसरले. यापूर्वी ओडिशाच्या बालासोरात रेल्वेचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात 280 प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र आता या रेल्वे अपघाताना आळा बसविण्यासाठी पश्चिम रेल्वेने नवीन यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने मुंबईतील लांब पल्ल्याच्या गाड्यांना 'कवच' बसवण्याचा निर्णय घेतला असून हे कवच मुंबई सेंट्रल ते विरार दरम्यान बसवण्यात येणार आहे. ही यंत्रणा अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीवर रेडिओ तंत्रज्ञानासह काम करणार आहे. नेमकी ही यंत्रणा कशी काम करणार आहे? जाणून घ्या...
'कवच' सुरक्षा प्रणाली आधीपासून भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या धावत्या गाड्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी स्वदेशी स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली बसविण्यात येत आहे. 'कवच' सुरक्षा प्रणाली म्हणजे लोकोमोटिव्ह पायलटला सिग्नल पासिंग अॅट डेंजर टाळण्यात मदत करते. मात्र लोकल ट्रेनच्या सुरक्षेसाठी ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टम (AWS) यंत्रणा बसविण्यात येणार आहे. भारतात विकसित झालेले हे तंत्रज्ञान जेव्हा दोन गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर येतात तेव्हा त्यांचा वेग कमी होतो आणि आपोआप ब्रेक लावला जातो. परिणामी या यंत्रणेमुळे मोठा अपघात टाळता येऊ शकतो. ही यंत्रणा बसवण्याचे काम पश्चिम रेल्वेवर सुरु झाले असून रतलाम ते मुंबई या गाडीला 'कवच' बसविण्यात येणार आहे. हे काम जून 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
'कवच' बसविण्यासाठी पश्चिम रेल्वेने तीन टप्प्यात स्वतंत्र कंत्राट दिले आहे. यामध्ये सुमारे 735 किमी मार्ग आणि 90 लोकोमोटिव्ह (इंजिन) साठी 2022 मध्ये काम सुरू झाले आहे. तर विरार-सुरत-वडोदरा या सुमारे 336 मार्ग, वडोदरा-अहमदाबाद 96 मार्ग आणि वडोदरा-नागदा-रतलाम भाग 303 मार्ग किमीचे काम सुरू आहे. यानंतर मुंबईतील विरार ते मुंबई सेंट्रल लोकलमध्ये 'कवच' बसविण्यात येणार आहे.
हिवाळा ऋतुमध्ये धुक्याची दाट शक्यता असते. अशावेळी सकाळच्या वेळेत धुके असतील मोटरमनला लोकलचा वेग कमी करावा लागतो. हे स्वयंचलित ब्रेक हवामान बदलाच्या वेळी उपयुक्त ठरतात. 'कवच' प्रणाली असेल तर धुके असताना ही लोकल सुरक्षितपणे चालविणे शक्य होईल. धुके असतील तर उच्च वेगाने आणि थेट लोको -टू- लोकमध्ये संवाद घडवून आणते आणि धोका टाळत असते. तसेच केबिनमध्ये लाइन-साइड सिग्ल डिस्प्ले सुधारत असते. यामुळे रेल्वेच्या समोरा-समोर धडकण्याच्या घटना कमी होतात. एएडब्ल्यूएस यंत्रणेत दोन महत्त्वाचे भाग असून त्यातील एक यंत्रणा रेल्वे मार्गात व दुसरी मोटरमनच्या कॅबिनमध्ये बसवली जाईल. सिग्नल रंगावरून ट्रेनचा वेग निश्चित केला जाईल. जेव्हा लोकल ट्रेन वेगमर्यादा ओलांडेल, तेव्हा ही यंत्रणा मोटरमनला सतर्क करेल. मात्र, मोटरमनकडून चार सेकंदांत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास स्वयंचलित ब्रेक तत्काळ लागतील. ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रति इंजिन सुमारे 70 लाख रुपये खर्च येतो.