Weather Update : राज्यातील तापमान घसरलं; देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये भुरभुरणाऱ्या बर्फाची चादर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आता थंडीची चाहूल लागली असून, शहरी भाग वगळता गावखेड्यामध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 30, 2023, 08:37 AM IST
Weather Update : राज्यातील तापमान घसरलं; देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये भुरभुरणाऱ्या बर्फाची चादर  title=
Weather Update Maharashtra winter himachal uttarakhand temprature drops down latest update

Maharashtra Weather Update : राज्यात आता ऑक्टोबर हिटचं प्रमाण कमी होताना दिसत असून, थंडी जोर धरताना दिसत आहे. महाराष्ट्राचा किनारपट्टी भाग आणि तिथं असणारं वातावरणातील आर्द्रतेचं प्रमाण काही अंशी उकाड्याला कारणीभूत ठरत असलं तरीही उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता हिवाळा तग धरताना दिसत आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळचं तापमान 33 अंशांहूनही कमी झालं असून, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी पट्ट्यासह नागपूरातही हिवाळा सुरु झाल्याची चिन्हं पाहायला मिळ आहेत. राज्यातील किमान तापमानात घट होत असल्याची नोंद करण्यात आल्यामुळं आता थंडीची सुरुवात झाल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद जळगावमध्ये करण्यात आली असून, इथं पारा 11.3 अंशांवर पोहोचला होता. तर, पुणे, निफाड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 15 अंशांहूनही कमी असल्याचं पाहायला मिळालं. 

राज्यात एकिकडे थंडीची हजेरी असली तरीही सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरात मात्र अंशत: पावसाचीही हजेरी असू शकते. पण, या तुरळक सरी हवामानावर फारसा परिणाम करताना दिसणार नाहीत. 

देशातही हुडहूडी, पण 'या' भागांत पावसाच्या सरी 

उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आणि जम्मू काश्मीरमध्येही पारा चांगलाच खाली गेला असून (Himachal Pradesh, Uttarakhand, Jammu Kashmir), आता थंडीनं या भागांमध्ये जोर धरला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी पायहायला मिळू शकते. उत्तरकाशी, रुग्रप्रयाग, चमोली या भागांमध्ये मात्र पावसाच्या तुरळक सरींची शक्यता आहे. तर, मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र हवामान कोरडं असेल. 

हिमाचलमध्येही स्पितीच्या खोऱ्यात काही भागांणध्ये बर्फवृष्टी पाहायला मिळेल. तर, मैदानी क्षेत्रांमध्ये थंड वारे वातावरण आणखी अल्हाददायक करून जातील. तिथं काश्मीरच्या खोऱ्यात भुरभुरणाऱ्या शुभ्र बर्फाची चादर तयार होऊन पर्यटकांना सातत्यानं खुणावत राहील. 

हेसुद्धा वाचा : नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ 

 

देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये म्हणजेच केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचा किनारपट्टी भाग इथं पावसाच्या मध्यम स्वरुपातील सरींची बरसात होईल. लक्षद्वीप, आणि अंदमानमध्येही अधूनमधून पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. त्यामुळं देशातील काही राज्य वगळता उर्वरित भागांमध्ये आता थंडीचच वर्चस्व पाहायला मिळेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.