ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: ऐन दिवाळीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 11, 2023, 10:48 AM IST
ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा title=
Weather update Maharashtra IMD issues alert for Mumbai and THESE Maharashtra districts

Maharashtra Weather Update: दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुणे आणि कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. 

पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रासह गोव्यात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारीही ही परिस्थिती कायम असून 11 नोव्हेंबर रोजी कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसणार आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पुणे, सातारा, अहमदनगर,नाशिक, दक्षिण कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

अवकाळी पावसाचा भात शेतीला मोठा फटका

उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्याला रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपलं असून अचानक पडलेल्या या  पावसाने आदिवासी भागातील भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जातेय. मात्र या अवकाळी पावसाचा रब्बीच्या ज्वारीसह इतर पिकांना फायदा होणार असून या अवकाळी पावसाने वातावरणात हि गारवा निर्माण झालाय.

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. माणगाव, गोरेगाव, पेण, कर्जत, खालापूर भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे दिवाळीच्या खरेदीवर परिणाम झाला असून आकाश कंदील, फटाके विक्रेत्यांना फटका बसला आहे. 

काल झालेल्या अवकाळी पावसाने अंबरनाथ मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  त्यामुळे पिक विमा कंपनीकडून आणि शासनाकडून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.