'...तर मराठी माणसाला पंतप्रधान करा', भाजपाला संतापलेल्या मनसेचं चॅलेंज; 'सलीम-जावेद'वरुन जुंपली

BJP Slams Raj Thackeray MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतील दादरमधील शिवाजीपार्क येथे आयोजित केलेल्या मनसे दिपोत्सव 2023 या 13 व्या दिपोत्सवाच्या कार्यक्रमाला राज ठाकरेही उपस्थित होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 11, 2023, 09:41 AM IST
'...तर मराठी माणसाला पंतप्रधान करा', भाजपाला संतापलेल्या मनसेचं चॅलेंज; 'सलीम-जावेद'वरुन जुंपली title=
दिपोत्सवाच्या मुद्द्यावरुन मनसे-भाजपा आमने-सामने

BJP Slams Raj Thackeray MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिपोत्सव 2023 चं उद्घाटन झालं. सलीम खान आणि जावेद अख्तर म्हणजेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध सलमी-जावेद या  जोडीबरोबर अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक आशितोष गोवारीकर यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यावरुन मनसेच्या मराठी प्रेमाबद्दल भाजपाने सवाल उपस्थित केला आहे. भाजपाने केलेल्या या टीकेवरुन मनसेनं भाजपाला थेट मराठी मणसाला पंतप्रधान करण्याचं आव्हान दिलं आहे.

भाजपाने नेमकं काय म्हटलं?

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी भाजपाने आयोजित केलेल्या दिपोत्सवामध्ये मनसेचा थेट उल्लेख न करता मनसेच्या दिपोत्सवातील मान्यवरांचा उल्लेख करत टीका केली. "काल एका दिपोत्सवाचं उद्घाटन झालं. आदपूर्वक नाव घ्यायचं झालं तरी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत झालं. आम्ही करतोय उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीमध्ये. आता मराठीचा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा हा प्रश्न आहे. आता काल करणाऱ्यांनी त्यांची टीमकी वाजवून घेतली सलमी-जावेदला घेऊन. ते मोठे असतील आणि आहेत पण आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत ओ," असं आशिष शेलार भाजपाच्या दिपोत्सवामध्ये म्हणाले. 

मराठी माणसाला पंतप्रधान करा

मनसेवर करण्यात आलेल्या या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शेलक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. मनसेनं दिपोत्सव साजरा केला. मराठी कलाकार, अभिनेत्यांना विसारले अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे, असं म्हणत देशपांडेना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडेंनी थेट मराठी माणसाला पंतप्रधान करावं अशी मागणी करण्याची हिंमत करावी असं म्हटलं आहे. "आशिष शेलार यांचं मराठीबद्दलचं प्रेम हे पुतण्या मावशीचं प्रेम आहे. एवढा जर मराठी माणसाबद्दल प्रेम असेल, पुळका असेल तर गुजराती माणसाऐवजी मराठी माणसाला पंतप्रधान करा. बघू आशिष शेलारांची कधी हिंमत होते का हे वाक्य बोलायची. जेव्हा मराठी कलाकारांवर अन्याय होतो. जेव्हा त्यांना थेअटर मिळत नाही तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं राहतं आणि कोण पार्श्वभागाला पाय लावून पळतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आशिष शेलारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा," असं संदीप देशपांडे म्हणाले.

थोबाडं बंद झाली

सलीम-जावेद यांना दिपोत्सवासाठी बोलवल्याने मनसेला ट्रोल केलं जात आहे. मनसेचं हेच हिंदुत्व आहे का वगैरे म्हणून टीका केली जात आहे, असं पत्रकाराने विचारलं. त्यावर संदीप देशपांडेंनी, "अनेकांनी जावेद साहेबांचं भाषण ऐकलं असेल. त्यांची (टीकाकारांची) थोबाडं बंद झालेली आहेत. ठीक आहे, संकुचित विचारांची लोक असतात. त्यांचा फार विचार करण्याची गरज नाही," असं उत्तर दिलं.

रितेश देशमुख कानडी कलाकार आहे का?

तुम्ही मराठी कालाकरांना बोलवणार आहात का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता संदीप देशपांडेंनी, "त्या दिवशी मराठी कलाकार नव्हते का? रितेश देशमुख कानडी कलाकार आहेत का? आशितोष गोवारीकर कोण आहेत? तामिळ कलाकार आहेत का? उगाच काहीही बोलायचं," असं म्हणत टोला लगावला. पुढे बोलताना संदीप देशपांडेंनी, "ज्या प्रकारचा प्रतिसाद मनसेच्या दिपोत्सवाला मिळतोय. त्याप्रकारचा प्रतिसाद भाजपावाल्यांना मिळत नाही. त्यामुळे आपलाही दिपोत्सव चर्चेत राहावा यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. काही लोकांची मानसिकताच संकुचित प्रवृत्तीची असते त्यांना आमच्या शुभेच्छा. दिवाळीनिमित्त त्यांच्या डोक्यात बुद्धीचा प्रकाश पडो, याच आमच्या शुभेच्छा!" असं म्हणत खोचक शब्दांमध्ये शेलार यांना लक्ष्य केलं.