मुंबई : मुंबई- ठाण्यासह उपनगरात पावसानं थोडी उसंत घेतली आहे. मात्र आज विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह काही नाशिक आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात वादळी वा-यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. त्यामुळे नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया इथे यलो अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय उर्वरीत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.
चंद्रपूर -गडचिरोली मार्गावर पाणी असल्यानं हा मार्ग प्रवासासाठी बंद आहे. तरीही पर्यटनाला आलेले हे महाशय याच पाण्यातून फिरत फिरत चालले होते.
दुस-या टोकावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी या इसमाला हटकलं आणि पुरातून प्रवास करण्याचं कारण विचारलं. त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिल्यावर पोलिसांनी त्याला दंडुक्याचा चांगलाच प्रसाद दिला.
नाशिक जिल्ह्यातल्या कळवण परिसरात मुसळधार पावसामुळे पाळे खुर्द-असोलीला जोडणारा रस्ता वाहून गेला. या गावातून जाणारा हा एकमेव रस्ता असल्याने शेतकऱ्यांचं दळणवळण ठप्प झालं.
बंधारासुद्धा फुटल्यानं बंधाऱ्यातील सर्व पाणी वाहून गेलंय. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहेत.