चांगला पाऊस पडूनही पाणीपातळी घटली

 नाशिक जिल्हा परिसरात यावर्षी १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तरीही  जिल्हातील सहा तालुक्यामधील पाणी भूजल पातळी घटल्याचं उघड झालंय. 

Updated: Nov 18, 2017, 02:57 PM IST
 title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्हा परिसरात यावर्षी १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तरीही  जिल्हातील सहा तालुक्यामधील पाणी भूजल पातळी घटल्याचं उघड झालंय. याभागात पावसाचे प्रमाण कमी असल्यान भूजल पातळीत घट झाल्याच सांगितले जात असल तरीही जलशिवार योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे.

शेतीचा जिल्हा म्हणून ओळखला

नाशिक जिल्हा हा शेतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. विविध पिकं घेणाऱ्या या जिल्ह्यावर यावर्षी पाणीटंचाईचं सावट आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यात भूजल पातळीत घट झालीय. 

जिल्ह्यात 127 मिलीमीटर पाऊस

यावर्षी नाशिक जिल्ह्यात 127 मिलीमीटर पाऊस झाला, तरीही नांदगाव, सटाणा, चांदवड, मालेगाव, येवला, देवळा तालुक्यात भूजल पातळीत घट झाल्याचं निदर्शनास आलं आहे. जिल्ह्यातल्या 185 विहीरींच्या माध्यमातून भूजल पातळीतली घट आणि वाढ नोंदवण्यात येते. त्यातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. 

जलयुक्त शिवार अंतर्गत उल्लेखनीय कार्य

विशेष म्हणजे चांदवड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य झालंय म्हणून दहा लाखांचं पारितोषिक देऊन गौरवही झालाय. त्यामुळे या कामावरच प्रश्नचिन्हं उपस्थित झालं आहे. 

पाणीटंचाई जाणवू लागल्याने टँकरची मागणी

पावसाळा उलटताच जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवू लागल्याने टँकरची मागणी वाढलीय. मात्र टँकर हा शेवटचा पर्याय असल्याचं सांगत जिल्हा प्रशासनाने ती मागणीही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे एकीकडे कमी पाऊस, दुसरीकडे पाण्याच्या पातळीत घट आणि प्रशासन टँकरही द्य़ायला तयार नाही अशा तिहेरी कात्रीत ग्रामस्थ अडकलेत. 

स्थिती संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात

नाशिक जिल्ह्यासारखीच स्थिती संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळतेय. विभागातचल्या 25 तालुक्यात भूजल पातळीत घट झाली आहे. 2015-16, आणि 2016-17 या दोन वर्षात सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र अशा योजनांसाठी 1153 कोटी रूपये खर्च करण्यात आले. मात्र पाण्यासारखा पैसा खर्चुनही टंचाई दूर झालीच नाही. त्यामुळे आता यावर उत्तर शोधण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर होणं गरजेचं आहे.