नागपूर : नागपूरमध्ये ग्रामस्थांना आनंदाची बातमी...
अशुद्ध आणि क्षारयुक्त पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या थडी पवनी गावात वॉटर एटीएम चा शुभारंभ करण्यात आला. शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांत देखील आनंदाचे वातावरण आहे.
६० वर्षीय पंढरीनाथ चरपे त्यांच्या गावात लावण्यात आलेल्या वाटर एटीएमचे पहिले ग्राहक आहेत. पिण्याकरिता शुद्ध पाणी उपलब्ध झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत आहे. चरपे यांच्यासारखीच सुविधा आता थडी पवनीतील सर्वच ग्रामस्थांना उपलब्ध झाली आहे. नागपूर पासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील थडी पवनी हे पुनर्वसित गाव.
१९९१ साली वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे या गावाचे पुनर्वसन झाले आहे. सुमारे ३ हजार लोकवस्ती असलेल्या या गावाचा पाणीपुरवठा हा विहीर व कूपनलिकेवर अवलंबून आहे. या भागातील पाणी जाड असून क्षारयुक्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ज्यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्या उद्भवत असतात. मात्र आता शुद्ध पाणी उपलब्ध झाल्याने रोगराई होणार नसल्याचा विश्वास ग्रामस्थांना आहे.
सामाजिक कार्यकर्ते व वनराई चे विश्वस्त डॉ गिरीश गांधी यांच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने हा वॉटर एटीएम स्थापन करण्यात आला आहे... गिरीश गांधी यांनी केलेल्या प्रयत्नामुळे थडी पवनी वासियांना अगदी नाम मात्र शुल्कात शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे... या वॉटर एटीएमचे उद्घाटन क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते झाले.
५ रुपयात २० लिटर पाणी या वॉटर एटीएम मधून नागरिकांना मिळणार आहे.. याकरिता एटीएम सारखे दिसणारे वॉटर कार्ड मिळणार आहे.. या कार्डात मोबाईल सीम प्रमाणे रिचार्ज करून कार्ड धारकाला हे कार्ड वापरता येते... यामुळे २५ पैसे प्रती लिटर या दराने नागरिकांना पाणी उपलब्ध होते... अशा प्रकारचे वॉटर एटीएम ग्रामीण भागात इतर ठिकाणी उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल एवढे मात्र निश्चित.