विवाहितेची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, त्याने वार करत संपवलं

विवाहतेची छेड काढणाऱ्या व्यक्तीला समजावण्यास गेलेल्या बाप लेकावर शस्त्राने हल्ला

Updated: Mar 16, 2022, 07:12 PM IST
विवाहितेची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, त्याने वार करत संपवलं title=

गणेश मोहाले, झी मीडिया, वाशिम :  विवाहितेची छेड काढणाऱ्या व्यक्तिला समजावण्यास गेलेल्या बाप लेकावर चाकूने हल्ला केल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात सुरेश विश्राम जाधव यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा अनिल जाधव गंभीर जखमी झाला आहे.

वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम चिखलागड इथं ही घटना घडली आहे. सुरेश जाधव यांच्या घराशेजारी राहणाऱ्या चुलत भावाची सून घरासमोरील अंगणात भांडी घासत होती. त्याचवेळी गावातील मंगल राठोड याने तिची छेड काढली. याचा जाब सुरेश जाधव यांनी मंगलला विचारला. त्यावर संतापलेल्या मंगलने सुरेश जाधव यांच्याबरोबर वाद घातला.

या वादातच मंगलने खिशातला चाकू काढून सुरेश जाधव यांच्यावर जीवघेणा हल्लाकेला. वडिलांच्या ओरडण्याच आवाज ऐकून त्यांचा मुलगा घराबाहेर आला. अनिल जाधव यांनी वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने अनिलवरही चाकूने वार केले. यात अनिलच्या हातावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत. 

या हल्ल्यानंतर आरोपी मंगल राठोडने घटनास्थळावरुन पोबारा केला. गावातल्या इतर लोकांनी सुरेश जाधव आणि अनिल जाधव यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचार सुरु असताना सुरेश जाधव यांचा मृत्यू झाला तर अनिल जाधवची प्रकृती गंभीर आहे.

जखमी अनिल जाधव याने दिलेल्या जबानीतून आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मंगल राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे.