दुर्दैवं! महाराष्ट्राने गमावले 7 भावी डॉक्टर

हा फक्त अपघात नाही तर आरोग्य क्षेत्राचं झालेलं मोठं नुकसान... महाराष्ट्राने 7 भावी डॉक्टर गमावले

Updated: Jan 25, 2022, 01:47 PM IST
दुर्दैवं! महाराष्ट्राने गमावले 7 भावी डॉक्टर  title=

वर्धा : अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. हा फक्त अपघात नाही तर आरोग्य क्षेत्राचं झालेलं मोठं नुकसान आहे. महाराष्ट्राने 7 भावी डॉक्टर गमावले आहेत. या भावी डॉक्टरांनी अनेकांचे प्राण वाचवले असते. ही कसर भरून न निघणारी आहे. 

वर्ध्याच्या सेलसुरामध्ये झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. वर्ध्यातील दत्ता मेघे मेडीकल कॉलेजमधील 7 विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तिरोडा गोरेगाव इथले भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कारचाही समावेश आहे. 

या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा संपली होती. तसंच आविष्कारच्या रुममेटचा वाढदिवस होता. त्यासाठी हे विद्यार्थी पार्टी करण्यासाठी देवळीला गेले होते. त्याठिकाणावरून वर्ध्याला परत येत असताना हा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार नदीच्या पुलावरून खाली कोसळली. 

वर्ध्याच्या नागपूर - तुळजापूर हायवेवर झालेला हा अपघात एवढा भीषण होता की चारचाकी गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघात एवढा भीषण होता की, सातही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा केवळ एक अपघात नाही तर महाराष्ट्राने 7 भावी डॉक्टर गमावले आहेत. हे आरोग्य क्षेत्रातील मोठं नुकसान आहे. पीएम फंडातून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.