हेमंत चापुडे, झी 24 तास, खेड : एखाद्या तरुणालाही लाजवेल असा उत्साह 75 वर्षीय पुण्यातल्या आजोबांमध्ये पाहायला मिळतो. पुण्याच्या खेड तालुक्यातील चिंचोशी गावातील मधुकर पाचपुते या पंच्याहत्तरीतल्या आजोबांनी सर्वांनाच थक्क केलंय. त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. ज्यामुळे त्यांनी नक्की असं काय केलं, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक्त आहेत. जवळ-जवळ 7 वर्षांनी बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानं, पाचपुते यांनी जल्लोषात घोडेस्वारी केली.
बैलगाडा शर्यत हे बळीराजा शेतकऱ्याचा जिव की प्राण बैलगाडा शर्यती वरती बळीराजा किती प्रेम करतो याचा प्रत्यय मावळ तालुक्यातील नानोली येथे बैलगाडा घाटात शर्यत प्रेमींना पाहायला मिळाला. त्याचं झालं असं की पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चिंचोशी गावच्या 75 वर्षीय मधुकर पाचपुते आजोबा आपल्या वयाचा विचार न करता उतरले.
तब्बल सात वर्षे बैलगाडा शर्यत बंद असल्याने बैलगाडा प्रेमींनी नाराज होते, मात्र बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने पाचपुते यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, ज्यामुळे पाचपुते जल्लोषात घोड्यावरती बसले आणि आनंदात घोडेस्वारी करु लागले.
हे दृष्य फारच आश्चर्यकारक आहे, कारण आपण त्यांच्या वयाचा विचार केला तर, इतकं वय असूनही त्यांच्या अंगातील ती उर्जा, तो उत्स्फूर्तपणा सर्वांनाच लाजवणारा आहे. या वयातील व्यक्ती अंथरुणाला खिळलेला असतो किंवा मग तो कोणाच्या तरी आधाराने पावलं टाकंत असतो, परंतु मधुकर पाचपुते आजोबांकडे पाहून तर तुम्हाला कौतुक वाटेल.
पाचपुते यांना या जेव्हा या प्रकारा बद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, लहानपणापासूनच त्यांना बैलगाडा शर्यतीचा नाद आहे, तसेच घोडी आणि शर्यतीचे बैल घरचे असल्याने त्यांना कधीही घोडीवर बसायला भीती वाटली नाही, उलटं त्यांना असं केल्यानं जास्त उत्साह आणि आनंदी वाटतं.
पाचपुते यांचा घोडीवरती बसलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या चांगलाच धुमाकूळ घालतोय, बैलगाडा घाटात जेव्हा एक 75 वर्षीय आजोबा घोडीवरती बसतात तेव्हा हा सर्व थरार पाहून बैलगाडा घाटात एकच टाळ्यांचा कडकडाट होतो.
हौसेला मोल नसतं असं म्हणतात, उत्तुंग इच्छाशक्ती च्या जोरावर मनुष्य कुठल्याही वयात काहीही करू शकतो, हेच मधुकर पाचपुते या बाबांनी दाखवून दिलंय त्यामुळे बाबांच्या या जिद्दीला आणि जिगरीला सलाम.