लैलेश बारगजे, अहमदनगर : राज्यातल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतीप्रमाणं नगर जिलह्यातल्या एका ग्रामपंचायतीचीही निवडणूक झाली. आणि एकाच घरात गावची सत्ता झाली. नगरमधल्या वाळवणे गावाचे दोघे कारभारी.... बायको सरपंच आणि नवरा उपसरपंच.... ग्रामपंचायत निवडणूक झाली आणि अख्ख्या गावानं या जोडप्यावर विश्वास दाखवला.
नवरा-बायको हाकणार गावाचा गाडा
राजश्री पठारे गावच्या सरपंच झाल्या आणि सचिन पठारे उपसरपंच झाले. गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 4 सदस्य बिनविरोध निवडून आले तर 5 सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. बिनविरोध झालेल्या 4 सदस्यांपैकी राजश्री पठारे आणि सचिन पठारे या जोडप्याला ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून दिलं.
राजश्री आणि सचिन दोघांचाही गावात सामाजिक कामात पुढाकार असतो. आताही गावाचा विकास करण्याचा त्यांचा निर्धार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोकशाहीच्या लिलावापासून ते भांडण-तंट्यांपर्यंत बरंच काही घडलं आहे. अशा वेळी अख्ख्या गावानं जोडप्यावर दाखवलेला हा विश्वास चांगला आहे.