अहमदनगर झेडपीवरील विखेंची सत्ता संपुष्टात

राष्ट्रवादीच्या राजश्री घुलेंची बिनविरोध निवड तर सोलापूरमध्ये भाजपनं शिवसेनेला साथ दिल्यानं राष्ट्रवादीचा पराभव...

Updated: Dec 31, 2019, 04:34 PM IST
अहमदनगर झेडपीवरील विखेंची सत्ता संपुष्टात  title=

अहमदनगर / सोलापूर : राज्यात भाजपला सत्तेतून दूर ठेवल्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेतही भाजपची कोंडी करण्यात विरोधी पक्षांना यश मिळाल्याचं दिसतंय. अहमदनगर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुलेंची बिनविरोध निवड झालीय. तर दुसरीकडे सोलापूरमध्ये भाजपनं शिवसेनेला साथ दिल्यानं राष्ट्रवादीचा पराभव झालाय.

अहमदनगर जिल्हा परिषदेवरील विखे पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलंय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले यांची निवड झालीय. महाविकास आघाडीच्या आव्हानासामोर भाजपनं माघार घेतल्यामुळे घुले यांची बिनविरोध निवड झालीय. भाजपकडून सुनिता खेडकर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र भाजपकडे बहुमत नसल्यामुळे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेनं महाविकास आघाडी केल्यामुळे राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला. यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे या अध्यक्ष होत्या.

दुसरीकडे सोलापुरात शिवसेनेच्या अनिरुद्ध कांबळेंची झेडपी अध्यक्षपदी निवड झालीय. त्यांनी काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादीचे त्रिभुवन धाईंचे यांचा पराभव केला. माजी खासदार रणजितसिंह पाटील मोहित पाटील यांनी शिवसेनेच्या मदतीनं राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.