पक्षातील बेईमान आम्हाला शोधायचे होते म्हणूनच... काँग्रेस आमदार फुटल्यानंतर विजय वडेट्टीवर यांचा मोठा खुलासा

vijay wadettiwar : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मत फुटली आहेत. यावर विजय वडेट्टीवर यांनी मोठा खुलासा केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 13, 2024, 08:12 PM IST
पक्षातील बेईमान आम्हाला शोधायचे होते म्हणूनच... काँग्रेस आमदार फुटल्यानंतर विजय वडेट्टीवर यांचा मोठा खुलासा  title=

Vidhan Parishad Election 2024:  विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याचे दिसत आहे.  काँग्रेसच्या 4 आमदारांची मतं फुटणार म्हणजे फुटणारच असा दावा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी निवडणुकीआधी केला होता. कैलास गोरंट्याल यांचा हा दावा खरा ठरला आहे. यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआचे उमेदवार शेकापचं जयंत पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या सर्व प्रकरणार प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य  केले आहे.  

महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे हे  लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले. पण, जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. पक्षातील बेईमान आम्हाला शोधून काढायचे होते म्हणूनच काँग्रेसने विधानपरिषद निवडणूक लढवली होती. आता पक्षातील कचरा साफ होईल. कालच्या निकालानंतर घरचे भेदी शोधण्यात आम्हाला यश आले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना संपूर्ण अहवाल देण्यात आला आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या बातम्या येत आहे. पण हे वृत्त पूर्ण चुकीचे आहे.आमदार कैलास गोरंट्याल हे पक्षनिष्ठ आहेत, त्यांच्याबाबतचे वृत्त खोडसाळपणाचे आहे असा खुलासा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

क्रॉस मतदान करणा-या आमदारांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्याची मागणी

काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधात मतदान केल्यानं आमदार विकास ठाकरे संतापलेत. क्रॉस मतदान करणा-या आमदारांना 6 वर्षांसाठी निलंबित करा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. आमदारांनी कोणाला मतदान केलं. कोणत्या आमदारांनी पक्षादेश धुडकावून लावला, हे पक्ष निरिक्षकांच्या लक्षात आलंही असेल. त्यामुळे कारवाई करावी अशी मागणी ठाकरेंनी केली.

विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणार - नाना पटोलेंचा इशारा

विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणार असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलाय.. गद्दारांची नावं आमच्याकडे आहेत.. हायकमांडचा आदेश आला की गद्दार आमदारांची नावं कळतील असंही पटोलेंनी स्पष्ट केलंय.. मात्र काँग्रेसच्या किती आमदारांनी मत फोडली हे पटोलेंनी सांगितलं नाही.