पुणे : पुणे महापालिका हा लुटारुंचा अड्डा असल्याचं आजवर अनेकदा समोर आलय. आता तर त्याबाबत एका स्टिंग ऑपरेशनची व्हिडिओ क्लिपच व्हायरल झालीय त्यामुळं भ्रष्ट लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांची पोलखोल झाली.
पालिकेच्या विद्यार्थी वसतिगृहातल्या खानावळीचं कंत्राट देताना तसेच शिक्षण मंडळातल्या बदल्यांच्या प्रकरणात कशाप्रकारे सेटलमेंट झाली त्याचं बिंग या स्टिंग ऑपरेशन मधून फुटलंय.
हा प्रकार महापालिका निवडणूकीच्या आधीचा आहे. मात्र तत्कालीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कशासाठी किती पैसे मिळाले याची कबुली त्यात नाव आणि रकमेसह देण्यात आलीय.
महापालिकेतील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यापासून शिक्षण मंडळाच्या सदस्यापर्यंत अनेकांच्या नावांचा त्यात स्पष्ट उल्लेख आहे. महापलिकेच्याच एका वरीष्ठ लिपिकाचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान हे स्टिंग ऑपरेशन झी मीडियाने केलंलं नाही. त्यामुळे व्हिडीओत आलेली नावं जाहीर करण्याचे आम्ही टाळलंय. या व्हिडीओची सत्यता पडताळून योग्य वेळी आम्ही हा संपूर्ण व्हिडीओ जसा आहे तसा प्रेक्षकांसमोर आणू...झी २४ तासच्या हाती असे आणखी काही व्हिडिओ लागले आहेत. तेही तुमच्यासमोर आणू.
दरम्यान हे सत्य जगासमोर आणल्याबद्दल पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी झी 24 तासचे अभिनंदन केलंय आणि याप्रकरणी कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय.