नागपूर : एप्रिल महिना संपत आला असताना राज्याच्या उपराजधानी सह संपूर्ण विदर्भातला पारा आता चढायला सुरवात झाली आहे. तर नागपूरचं तापमान ४४ पॉईंट ३ अंश सेल्सियस नोंदवण्यात आलंय. त्या खालोखाल अकोला आणि वर्धा शहराचं तापमान ४५ अंश राहिलं आहे. येत्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दरम्यान, रविवारच्या दिवशी चंद्रपूरमध्ये यंदाचं सर्वाधिक ४६ पॉईंट ४ डिग्री इतकं तापमान नोंदवलं गेलं. चंद्रपुरातल्या कोळसा खाणी आणि वातावरणातलं प्रदूषण यामुळे इथलं तापमान नवे उच्चांक गाठत आहे. परिणामी अतिउष्ण झळा आणि उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे चंद्रपूरकर पुरते हैराण झाले आहेत. शहरातले रस्ते दुपारी निर्मनुष्य झालेले बघायला मिळताहेत. आवश्यक कामांसाठीच नागरिक घराबाहेर पडत असून, बाहेर पडतानाही कान-चेहरा रुमालानं झाकण्याची काळजी घेत आहेत.
एकंदीरत या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांची दैनंदिनीच बदलून गेली आहे. यामुळे राज्यातलं सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूरला ओळखले जाऊ लागले आहे. दरम्यान, राज्यात उष्णतेचा उकाडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे वृक्ष लागवडीचं प्रमाण वाढवणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय.