यवतमाळ : वर्चस्व टिकवण्याचं शिवसेनेचं आव्हान

यवतमाळ... महाराष्ट्राचं १३ वर्षं मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचा हा जिल्हा.... 

Updated: Jun 13, 2018, 10:58 PM IST
यवतमाळ : वर्चस्व टिकवण्याचं शिवसेनेचं आव्हान title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळ... महाराष्ट्राचं १३ वर्षं मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचा हा जिल्हा.... पण सध्या हा जिल्हा बदनाम झालाय तो शेतकरी आत्महत्यांमुळं... दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या दुष्चक्रात अडकलेल्या बळीराजानं थेट आत्महत्येचं पाऊल उचललं... त्यामुळं चुकीच्या कारणासाठी यवतमाळ देशाच्या नकाशावर आलं... मानव विकास निर्देशांकाच्या निकषांवरही यवतमाळ जिल्हा पिछाडीवर आहे.

२००९ सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर यवतमाळ वाशिम हा एकत्रित मतदारसंघ अस्तित्वात आला. त्याआधीच्या यवतमाळ मतदारसंघावर सुरूवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. मात्र अंतर्गत गटबाजीमुळं १९९६, २००४, २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळला. देवराव पाटील आणि त्यांचे पुत्र उत्तमराव पाटील यांनी तब्बल ८ वेळा या मतदारसंघातून खासदारकी भूषवली. १९९६ च्या निवडणुकीत कॉंग्रेसनं उत्तमराव पाटील यांची उमेदवारी कापून गुलामनबी आझाद यांना निवडणुकीत उतरवलं आणि तिथूनच काँग्रेसला गटबाजीची लागण झाली. 

या निवडणुकीत गुलामनबींना पराभूत करून भाजपचे राजाभाऊ ठाकरे विजयी झाले. २००४ च्या निवडणुकीत भाजपच्या हरिभाऊ राठोड यांनी उत्तमराव पाटील यांना धूळ चारली. २००९ मध्ये यवतमाळ मतदारसंघाचं विभाजन झालं. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. वाशिममध्ये शिवसेनेच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. १९९८ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्या पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आल्या, तेव्हा त्यांनी कॉंग्रेसच्या अनंतराव देशमुखांचा पराभव केला. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुसदच्या दिग्गज नाईक घराण्यातील मनोहर नाईक यांना पराभूत केले. २००९ च्या निवडणुकीपूर्वी लोकसभेतील अणूऊर्जेच्या चर्चेत हरिभाऊ राठोड यांनी भाजपचा आदेश झुगारून कॉंग्रेसला मतदान केलं. कॉंग्रेसनंही उपकाराची परतफेड म्हणून भाजपमधून हकालपट्टी झालेल्या हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी दिली. त्यामुळं नाराज झालेल्या उत्तमराव पाटील यांनी हातोडा मारण्याचा आदेश दिल्यानं काँग्रेस पुन्हा हरली. शिवसेनेच्या भावना गवळी पुन्हा विजयी झाल्या. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसनं तत्कालिन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी दिली... मात्र माणिकराव ठाकरे गट विरूद्ध मोघे वादात शिवसेनेच्या भावना गवळी चवथ्यांदा लोकसभेत पोहोचल्या.

 

भावना गवळी यांना ४ लाख ७७ हजार ९०५ मते, तर मोघे यांना ३ लाख ८४ हजार ८९ मते मिळाली. बसपाचे बळीराम राठोड ४९,९८१ मते घेवून तिसऱ्या स्थानावर गेले. बंजारा आणि आदिवासीबहुल अशा या मतदारसंघात कायम कुणबी समाजाचा उमेदवारच निवडून आलाय. अपवाद फक्त २००४ च्या निवडणुकीत विजयी झालेले बंजारा उमेदवार हरिभाऊ राठोड यांचा...

या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दिग्रस, पुसद आणि राळेगाव हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा हे दोन मतदारसंघ आहेत. या ६ पैकी यवतमाळ,राळेगाव, वाशीम आणि कारंजा या चार मतदारसंघात भाजपचे आमदार असून दिग्रसमध्ये शिवसेना तर पुसदमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत सेनेचे सर्वाधिक २० सदस्य असले तरी १८ सदस्य असलेल्या भाजपनं काँग्रेस-राष्ट्रवादी शी युती करून काँग्रेसला अध्यक्षपद मिळवून दिलं.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या भावना गवळी पुन्हा सज्ज झाल्यायत... यावेळी भाजपही सेनेच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता असून, भाजपकडून निवृत्त उपायुक्त पी बी आडे, माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, मनसेतून भाजपवासी झालेले राजू राजे पाटील आणि माजी आमदार विजय जाधव इच्छुक आहे. काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे आणि हरिभाऊ राठोड मोर्चेबांधणी करत आहेत. या लढाईत भावना गवळी पाचव्यांदा खासदार बनणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय...