Urfi Javed : "लोकांच्या नजरेत येण्यासाठी..."; बेड्या ठोका म्हणणाऱ्या चित्रा वाघ यांना उर्फीचे प्रत्युत्तर

Urfi Javed : सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी बाई असा उल्लेख करत चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका केली होती. त्याच टीकेला आता उर्फीने प्रत्युत्तर दिलं आहे

Updated: Jan 1, 2023, 12:37 PM IST
Urfi Javed : "लोकांच्या नजरेत येण्यासाठी..."; बेड्या ठोका म्हणणाऱ्या चित्रा वाघ यांना उर्फीचे प्रत्युत्तर title=

Urfi Javed Reply Chitra Wagh : आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदवर अनेकदा तिच्या कपड्यांवरुन टीका केली जातेय. तिने घातलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडियावर  कायचम चर्चा होत आलीय. मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करत उर्फी तिला जे योग्य वाटतय तेच करण्याचा सातत्याने ती प्रयत्न करतेय. अशातच आता उर्फी जावेद (Urfi Javed) राजकारण्यांच्याही निशाण्यावर आली आहे. राजकारणही आता खुलेपणाने उर्फीवर टीका करत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. मात्र उर्फीनेही यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

उर्फी जावेदला बेड्या ठोका - चित्रा वाघ

भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शुक्रवारी उर्फी जावेदला तिच्या पेहरावावरुन लक्ष केले होते. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदला बेड्या ठोका अशी थेट मागणीच मुंबई पोलिसांकडे केली होती. "अरे.. हे काय चाललंय मुंबईत रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये," असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले होते.

chitra wagh tweet

 

लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य केले - उर्फी जावेद

यानंतर आता उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. "आजच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य केले जात आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणे, खूपच सोयीस्कर आहे. हे नेहमीच पीडितांच्या कपड्यांना दोष देत असतात. बेरोजगारी, लाखो बलात्काराची प्रलंबित प्रकरणे, खून यासाखी आणखीही प्रकरणे आहेत. त्याचे काय?," असा सवाल उर्फीने चित्रा वाघ यांना केला आहे. 

फक्त जनतेचे मत वळवण्याचे काम करताय

"तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेसाठी बोलता पण त्यासाठी काही करत नाहीत. माझा विषय काढून फक्त जनतेचे मत वळण्याचे काम तुम्ही करत आहात. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही करत का नाही? महिला शिक्षण, लाखो-लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणे? तुम्ही काही करत नाही?," असेही उर्फीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

उर्फीच्या नावे राहुल गांधी यांनाही ट्रोल करण्याचा प्रयत्न

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्रोल करण्यासाठीही  उर्फी जावेदच्या नावाचा वापर करण्यात आला होता. राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी गुजरातमधील एका भाजप कार्यकर्त्याने एक ट्वीट केले होते. या ट्वीटमुळे उर्फी चांगलीच संतापली होती. या ट्विटचा स्क्रिनशॉर्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत उर्फीने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.