अनिरूद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : तुम्ही शेतकरी आहात आणि नियमितपणे युरियाची खरेदीही करता, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही किती बॅगची खरेदी केली आणि किती बॅग तुमच्या नावावर ऑनलाईन नोंदवल्या गेल्या हे आवर्जून तपासून पाहा.
कारण शेतकऱ्यांच्या नावावर जास्तीच्या बॅग्सची ऑनलाईन नोंदणी करून राज्यात राजरोसपणे युरियाचा घोटाळा सुरू झाला आहे. या गोरखधंद्याचं वास्तव झी 24 तास समोर आणतंय. अमरावती जिल्ह्यातल्या पूर्णानगर गावचे उमेश मोहिंगे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी एका कृषी केंद्रातून युरियाच्या 4 बॅग्स घेतल्या. मात्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना त्यांच्या नावावर 4 नव्हे तर 6 बॅग्जची नोंदणी झाली. मग त्यांच्या नावावरच्या दोन बॅग्स कुठे गेल्या हा सवाल उपस्थित होतोय.
उमेश मोहिंगे असे एकटेच शेतकरी नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत केंद्र संचालकांकडून लुटीचा असा गोरखधंदा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नावावर जास्तीच्या बॅग्सची नोंदणी करून काळ्या बाजारात त्यांची चढ्या दरानं विक्री केली जात आहे.
युरिया खरेदी करतेवेळी कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांचं आधारकार्ड आणि अंगठा घेतला जातो. त्यानंतर युरिया दिला जातो. मात्र दुकानदार इथच चलाखी करतात. शेतकऱ्याला जी पावती दिली जाते त्यावर पेनानं बॅगांची आकडेवारी टाकली जाते. मात्र सोबतच दुकानदाराला या बॅग्सची अॅपवरही नोंदणी करावी लागते. तिथे दुकानदार बॅगांची संख्या जास्त टाकतात. त्यामुळे पोर्टलवर बॅगांची संख्या जास्त दिसते. शेतकऱ्यांना मात्र कमी बॅगा मिळालेल्या असतात.
आधीच पावसानं दडी मारल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यात आता खतांच्या माध्यमातून घोटाळेबाजांनी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट सुरू केली आहे. झी 24 तासच्या बातमीनंतर कृषी अधिकारी आणि राज्य सरकार घोटाळेबाजांवर कडक कारवाई करेल हीच अपेक्षा.