Yashashree Shinde Murder Case Big Update: नवी मुंबईमधील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. आरोपी दाऊद शेखला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या तपासामध्ये एक महत्त्वाचा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागला असून यामधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 25 जुलै रोजी पनवेल रेल्वे स्थानकाजवळ यशश्रीचा मृतदेह आढळून आल्यानंतर नवी मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. आरोपीला तातडीने अटक करुन फाशीची शिक्षा करावी या मागणीसाठी 29 गावांमधील नागरिकांनी मोर्चा काढला होता. आता या प्रकरणामध्ये यशश्रीला नक्कीच न्याय मिळेल असा एक महत्त्वाचा दुवा पोलिसांना सापडला आहे. पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलं आहे आणि त्याचा काय परिणाम होणार पाहूयात...
समोर आलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी पनवेल रेल्वे स्थानकाजवळ यशश्रीचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिची हत्या तिचा मित्र दाऊदनेच केल्याचा संक्षय व्यक्त केला. या आधारे पोलिसांनी कर्नाटकमध्ये दाऊदचा शोध घेण्यासाठी काही टीम पाठवल्या. काही दिवसांमध्ये दाऊदला अटक केल्यानंतर हत्येचा दिवशीची घटनाक्रम समोर आला. यशश्री आणि आरोपी दाऊद एकमेकांच्या चांगले परिचयाचे होते. दाऊद हा यशश्रीला लग्न करण्याची आणि लग्न करुन कर्नाटकला त्याच्यासोबत त्याच्या गावी येण्यासाठी दबाव टाकत होता.
यशश्री त्याच्या मागणीला फारसं महत्त्व देत नव्हती. तरीही दाऊदच्या मोबाईलमध्ये यशश्रीचे काही खासगी फोटो होते. हे फोटो आपण फेसबुकवर अपलोड करु अशी धमकी देत दाऊदने 25 जुलै रोजी यशश्रीला भेटायला बोलावलं. या दोघांची भेट झाली. त्यावेळेस यशश्रीसमोर दाऊदने तिचे ते फोटो डिलीट केले. मात्र त्यानंतरही तो तिला लग्न करण्याची आणि कर्नाटकला येण्याची गळ घालू लागला. पण यशश्री तिच्या निर्णयावर होती. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि आधीपासूनच यशश्रीची हत्या करण्याच्या इराद्याने हत्यार घेऊन आलेल्या दाऊदने तिच्यावर अनेक वार करुन तिची हत्या केली आणि तो बसने पुन्हा स्वत:च्या गावी निघून गेला.
नक्की वाचा >> उरण हत्याकांड: यशश्रीच्या शरीरावर आरोपीच्या नावाचा टॅटू; शेवटच्या भेटीत 'ते' फोटो डिलीट केले पण...
यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊदने तिचा मोबाईल गायब केला होता. तसेच हत्येसाठी जे हत्यार वापरलं ते सुद्धा त्याने गायब केलं होतं. दाऊदला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून ही कोठडी 13 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. याच कालावधीमध्ये पोलिसांनी मागील 2 आठवड्यांमध्ये केलेल्या तपासानंतर त्यांच्या हाती यशश्रीचा मोबाईल आणि दाऊदने तिची हत्या करण्यासाठी वापरलेलं हत्यार सापडलं आहे.
यशश्रीची हत्या केल्यानंतर आपण उरण रेल्वेमार्गा लगत तिचा मोबाईल फेकूनदिला होता. तसेच ज्या चाकूने आपण तिची हत्या केली तो सुद्धा त्याच ठिकाणी फेकल्याचं दाऊदने तपासादरम्यान पोलिसांना सांगितलं. दाऊदने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम रावबली असता त्यांना यशश्रीचा मोबाईल आणि हत्येसाठी वापरलेला चाकू सापडला आहे.
नक्की वाचा >> उरण हत्याकांड: 'तो' कॉल लागला असता तर यशश्री वाचली असती?
यशश्रीचा मोबाईल हाती लागल्याने अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. या मोबाईलमधून यशश्री आणि दाऊदचे चॅटवरील संभाषण किंवा त्यासंदर्भातील पुरावे मिळू शकतात. यशश्रीने तिच्यावर हल्ला होण्याआधी कोणाला फोन केला होता? यशश्री आणि दाऊदचं किती वरचे वर बोलणं व्हायचं? यासारख्या प्रश्नांची उत्तर या मोबाईलमध्ये दडलेली असू शकतात. हा मोबाईल या प्रकरणामधील सर्वात मोठा पुरावा ठरु शकतो. तर दुसरीकडे हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार सापडल्याने आरोप निश्चितीमध्ये याचा फायदा होईल.