गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : चौघा भावांनीच उपसरपंचाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना वाशिममध्ये (Washim) घडली आहे. या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. भर दिवसा भर रस्त्यात ही हत्या करण्यात आली आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे (Crime News). जुन्या राजकीय वादातून हा प्रकार घडला आहे.
वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील बोराळा गावात हे हत्याकांड घडले आहे. बोरोळा गावचे उपसरपंच विश्वास कांबळे यांचा गावातीलच काही लोकांनी अपहरण करून नंतर त्यांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कांबळे यांच्या भावांनीच हा हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात इसमांनी विश्वास कांबळे यांचं किन्ही राजा परिसरातून एका कार मधूनअपहरण केलं होते. त्यानंतर मालेगाव तालुक्यातीलच गुंज फाट्या नजीक त्यांना बेशुद्ध अवस्थेत टाकून देण्यात आले.
कांबळे यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विश्वास कांबळे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोराळा गावातील केशव वानखेडे, नामदेव वानखेडे, रामचंद्र वानखेडे, श्यामसुंदर वानखेडे यांना अटक करण्यात आली आहे. हे चौघेही सख्खे भाऊ आहेत. यातील अन्य आरोपीचा शोध जउळका पोलिस घेत आहेत.
मृतक विश्वास कांबळे हे बोराळा गावचे उपसरपंच असून त्यांची जुन्या राजकीय वादातून हत्या करण्यात आली आहे. मृत कांबळे यांच्या पत्नीने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.